भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना ‘धक्का’; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवड होण्यात महायुतीने आघाडी घेतली असून सर्वाधिक उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत. उमेवारी अर्ज छाननीनंतर आज आणखी काही उमेदवारांना अर्ज माघारी घेतल्याने भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे. भाजपने (BJP) आत्तापर्यंत 11 उमेदवार बिनविरोध केले होते, आता त्यात आणखी एक भर पडली असून भाजपचा 12 वा उमेदवार पिंपरी चिंचवडमधून (Pune) बिनविरोध निवडून आला आहे. भोसरी मतदारसंघातील प्रभाग 6 ब मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध झाले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खाते उघडल असून रवी लांडगे हे बिनविरोध झाले आहेत. विशेष म्हणजे 2017 ला भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नेस्तनाबूत केला होता, त्यावेळीही रवी लांडगे यांनी भाजपचं खातं उघडलं होतं. आता पुन्हा एकदा रवी लांडगे बिनविरोध झाले आहेत. ते प्रभाग 6 मधील ब जागेवर नशीब आजमावत होते. येथे, अजित पवार राष्ट्रवादीचे निलेश सूर्यवंशी यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यानं, त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून दोन अर्ज उरले होते. त्यात रवी यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे यांचा एक आणि प्रसाद ताठे यांचा दुसरा अर्ज होता. पत्नी तर माघार घेणार होत्याचं, प्रश्न ताठे यांचा होता. लांडगे यांनी त्यांची मनधरणी केली अन् ताठे यांनीही निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाले आहेत. आता, त्यांच्या विजयाची केवळ घोषणा बाकी आहे. त्यामुळेच, आमदार महेश लांडगेंसह भाजप समर्थकांनी जल्लोष केला. दरम्यान, आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता, मी केवळ भाऊंच्या विचारांना पाठिंबा देण्यासाठी प्रभागाच्या विकासासाठी माझा अर्ज माघारी घेत आहे, असे अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांनी म्हटलं.

महेश लांडगेंकडून सर्वांचे आभार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भोसरीसह शहरातील गावकी-भावकी एक राहिली पाहिजे. त्यासाठी शक्य त्या ठिकाणी राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करा, असा संदेश दिला होता. त्यानंतर, रवि लांडगे यांचा प्रवेश आणि पुन्हा बिनविरोध निवड होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. तसेच, शहराचे नेते स्व. अंकुशराव लांडगे यांना 2017 आणि आता 2026 मध्ये बिनविरोध निवडीच्या निर्णयाने विधायक आदरांजली ठरणार आहे. भाजपासह मित्र पक्ष व समविचारी संस्था- संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेतला. त्या सर्वांची मी आभार व्यक्त करतो. तसेच, शहरातील हा पहिला विजय तमाम पिंपरी-चिंचवडकरांना आणि शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या स्वाभिमानी भूमिपुत्रांना समर्पित करतो, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा

Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.