ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
मुंबई : केंद्र सरकारनं तंबाखूजन्य उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी आणि सुधारित उत्पादन शुल्क 1 फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं तंबाखूजन्य पदार्थ म्हणजेच तंबाखू, सिगारेट, बीडी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सलग दुसऱ्या दिवशी फटका बसला आहे. आयटीसीच्या शेअरमध्ये दोन दिवसात 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. आयटीसीच्या शेअरनं तीन वर्षांचा नीचांक गाठला आहे. दोन दिवसात आयटीसीच्या गुंतवणूकदारांचं 72300 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. यामुळं एलआयसीला देखील मोठा फटका बसला आहे.
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आयटीसीमध्ये 15.86 टक्के गुंतवणूक आहे. एलआयसीकडे आयटीसीचे 1,98,58,07,233 शेअर सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत होते. त्यानुसार एलआयसीचं 11460 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसबीआय म्युच्युअल फंडची देखील आयटीसीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आयटीसीत इतर म्युच्युअल फंडकडून देखील गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आयटीसीची मालकी प्रमोटर्स किंवा प्रमोटर ग्रुपकडे नाही. यामुळं एलआयसी आणि इतर म्युच्युअल फंडचं मोठं नुकसान दोन दिवसात झालंय.
आयटीसीचा स्टॉक 1 जानेवारी 2026 जवळपास 10 टक्क्यांनी घसरला होता. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 5 टक्क्यांनी घसरुन 345.25 रुपयांवर आला.
ITC: आयटीसीचा स्टॉक का घसरला?
वित्त मंत्रालयानं बुधवारी तंबाखूजन्य उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय देखील करण्यात आला आहे. सिगारेटच्या लांबीनुसार 1000 स्टीकवरील उत्पादन शुल्क 2500-8500 रुपये करण्यात आलं आहे. या निर्णयामुळं शेअर बाजारात तंबाखू कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे.
वित्त मंत्रालयानं करवाढीचा निर्णय घेतल्यानं सिगारेट उत्पादकांकडून दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जीएसटी 40 टक्के आकारण्याचा आणि उत्पादन शुल्क वाढीच्या निर्णयाच्या परिणामापासून वाचण्यासाठी सिगारेटचे दर 40 टक्क्यांनी वाढू शकतात, याचा परिणाम ग्राहकांवर होईल, असं मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकानं म्हटल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं तंबाखूजन्य पदार्थांवर करवाढ लागू केली आहे ती 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यामुळं सिगारेट उत्पादक कंपन्या जानेवारी महिन्यात उत्पादन वाढवण्यावर भर देऊ शकतात.
दुसरीकडे गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज 41.80 रुपयांची घसरण झाली आहे. तर, व्हीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर देखील 4.45 रुपयांनी घसरला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.