बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? उद्धव, राज की एकनाथ शिंदे? जाणून घ्या काय सांगतो सर्व्हेचा
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. भगवी शाल, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि आक्रमक, धारदार भाषणशैली ही त्यांची ओळख बनली होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आणि देशभरात ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून ओळख निर्माण केली. 2012 साली बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आता 14 वर्षे उलटली आहे.
मात्र, त्यांच्या राजकीय वारशाचा खरा वारसदार कोण, हा प्रश्न आजही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे नेतृत्व गेले, पण 2022 साली एकनाथ शिंदे (मराठी) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड केल्यानंतर याबाबत चर्चा अधिकच रंगल्या. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण? याबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर C-Voter ने ‘उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे, यापैकी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार कोण?’ या प्रश्नावर घेतलेल्या सर्व्हेमधून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.
Who is Balasaheb Thackeray true successor : एकूण मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आघाडीवर
या सर्व्हेच्या एकूण आकडेवारीनुसार, 41 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांनाच ‘ठाकरे ब्रँड’चा खरा वारसदार मानले आहे. तर 27.6 टक्के लोकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि 10.4 टक्के लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पसंती दिली आहे. याशिवाय, 8.8 टक्के मतदारांनी ‘कोणीच नाही’, तर 5.8 टक्के लोकांनी ‘ठाकरे ब्रँड संपला आहे’ असे मत नोंदवले आहे.
Who is Balasaheb Thackeray true successor : तरुणांमध्ये शिंदेंना आघाडी
वयोगटानुसार पाहिले असता, 18 ते 24 वयोगटात एकनाथ शिंदे यांना 35.4 टक्के समर्थन मिळाले असून, याच गटात उद्धव ठाकरे यांना 28.8 टक्के पसंती आहे. मात्र, 25 ते 34, 35 ते 44, 45 ते 54 आणि 55 वर्षांवरील सर्व वयोगटांत उद्धव ठाकरे स्पष्ट आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, 55 वर्षांवरील वयोगटात तब्बल 50.3 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांनाच ठाकरे ब्रँडचा खरा वारसदार मानले आहे.
Who is Balasaheb Thackeray true successor : सामाजिक गटांनुसारमतांचे चित्र
सर्व्हेमधून सामाजिक गटांनुसारही महत्त्वाचे ट्रेंड समोर आले आहेत. अनुसूचित जाती-दलित गटात 47.7 टक्के, उच्चवर्णीय हिंदूंमध्ये 43.4 टक्के, तर मुस्लिम मतदारांमध्ये 37.1 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी गटात मात्र लढत तुल्यबळ असल्याचे दिसून येते. या गटात उद्धव ठाकरे यांना 36.2 टक्के, तर एकनाथ शिंदे यांना 33.7 टक्के समर्थन मिळाले आहे.
Who is Balasaheb Thackeray true successor : एनडीए समर्थक मतदारांमध्ये शिंदेंना पसंती
राजकीय कल पाहता, एनडीए समर्थक मतदारांमध्ये 39.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे ब्रँडचा वारसदार मानले आहे. तर महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये तब्बल 57.7 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे ठाकरे ब्रँडचा मुद्दा थेट राजकीय ध्रुवीकरणाशी जोडला गेल्याचे स्पष्ट होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण : फरक फक्त भाषिक आधारावर
भाषिक गटांमध्येही मतांमध्ये तफावत दिसून येते. मराठी भाषिकांमध्ये 44.3 टक्के लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने, तर हिंदी भाषिकांमध्ये 40.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे. एकंदरीत, ठाकरे नावाशी जोडलेली भावनिक नाळ आणि राजकीय वारसा आजही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेला आहे. मात्र, तरुण मतदार, ओबीसी समाज आणि एनडीए समर्थकांमध्ये एकनाथ शिंदे यांची पकड मजबूत होत असल्याचेही या सर्व्हेने अधोरेखित केले आहे. त्यामुळेच, ‘ठाकरे ब्रँड’चा खरा वारसदार कोण? हा प्रश्न आगामी काळातही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार, हे मात्र निश्चित आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.