राज ठाकरेंनी महाजनांना लाकूडतोड्या म्हणत डिवचलं, आता गिरीश महाजनांचं जशास तसं उत्तर; म्हणाले…
गिरीश महाजन राज ठाकरेंवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकमधील (Nashik News) तपोवन (Tapovan) परिसरात सुरू असलेल्या तयारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. तपोवनातील झाडे छाटण्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा ‘लाकूडतोड्या’ म्हणून उल्लेख केला होता. या टीकेनंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना जशास तसं उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना मंत्री महाजनांवर खोचक शब्दांत टीका केली होती. “संजय राऊत म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत,” असा घणाघाती टोला राज ठाकरेंनी लगावला होता.
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: डाव्या विचारसरणीचे लोक अडथळे निर्माण करताय
या टीकेला प्रत्युत्तर देताना, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर आयोजित भाजपच्या सभेत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी आवश्यक तयारी सुरू असून, गेल्या दहा-बारा वर्षांत आपोआप उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून मुद्दाम वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली काही डाव्या विचारसरणीचे लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: आम्ही मोठी झाडे तोडणार नाही
महाजन म्हणाले की, “आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही अनेकदा दिली आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आली असून उर्वरित झाडांची लागवडही सुरू आहे. मात्र, नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकलेला नाही. तरीही झाडांना चिटकून बसून धार्मिक कार्यक्रमात खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
Girish Mahajan on Raj Thackeray: मला लाकूडतोड्या म्हणतात, बोलू द्या, ते मोठे आहेत
राज ठाकरे यांनी आपल्याला ‘लाकूडतोड्या’ म्हणत खिल्ली उडवल्याचा उल्लेख करत महाजन म्हणाले, “मी स्वतः २० हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांना आता जाग आली, ते झाडाला मिठी मारून गेले. राज ठाकरे काहीही बोलतात, मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात. मला लाकूडतोड्या म्हणतात; बोलू द्या, ते मोठे आहेत.”
Girish Mahajan on Raj Thackeray: पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेलाही महाजनांनी प्रत्युत्तर दिले. “फडणवीस हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलतात, अशी टीका होते; मात्र ते विकासाशिवाय काहीही बोलत नाहीत. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
Girish Mahajan: ते एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही
महाजन यांनी यावेळी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि सलग निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी मविआवर टीका केली. “ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, महाविकास आघाडी एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्येही तो सार्थ ठरेल,” असा दावा त्यांनी केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.