मुंबईच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज्यात मराठी माणसाला नागवण्याची.

बीएमसी निवडणूक 2026 च्या निकालावर राज ठाकरे मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं.

मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 165 जागा लढवल्या होत्या. तर 53 जागांवर मनसेने निवडणूक लढवली. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यांतर आता मुंबई महानगरपालिकेतील या निकालानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

राज ठाकरे पोस्टद्वारे काय काय म्हणाले? (Raj Thackeray On BMC Election Result 2026)

सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असं राज ठाकरेंनी सांगितले.

निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही- राज ठाकरे (Raj Thackeray BMC Election Result 2026)

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे.  ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी- (MNS Winning Candidate BMC Election Result 2026)

प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी…

प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी…

प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी…

प्रभाग क्रमांक 205 मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी

प्रभाग क्रमांक 115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी

प्रभाग क्रमांक 192 यशवंत किल्लेदार.

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर…

आणखी वाचा

Comments are closed.