एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला
ठाणे महापालिका निवडणुकीचा निकाल : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. अनेक ठिकाणी भाजपने मोठा विजय मिळवला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठं यश मिळवलं आहे. मात्र, ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ‘शुभदिप’नावाचे निवासस्थान आहे. याच प्रभागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) संपत खुस्पे यांनी मोठा विजयम मिळवला आहे. खुस्पे यांनी या प्रभागात 5 टर्म नगरसेवक राहिलेले शिवसेना उमेदवार व माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
आई वडिलांना अश्रू आनावर
ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला केवळ एकच जागा मिळावता आली आहे. पण त्याच नगरसेवकाची चर्चा खूप आहे. कारण खुद्द एकनाथ शिंदे ज्या भागात राहतात त्याच भागात मतदारांनी धनुष्यबाण सोडून मशाल चिन्हाला पसंती देत शहाजी खुस्पे यांना निवडून आणले आहे. इतकेच नाहीतर त्यांची ही पहिलीच निवडणूक असताना त्यांनी अशोक वैती या पाच टर्म नगरसेवक आणि माजी महापौर असलेल्या उमेदवारास चितपट केले आहे. त्यामुळं देखील खुस्पे यांचा विजय मोठा मानला जात आहे. पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या शहाजी यांच्या विजयानंतर त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. बायको आणि आईच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू आहेत.
शिवसेना शिंदे गटाने तिकीट नाकारल्यामुळं मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवली
गेले अनेक वर्ष समर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. मात्र त्यांना शिवसेना शिंदे गटाने तिकीट दिले नाही. अखेर त्यांनी मशाल उचलली आणि जिंकून देखील आले. आज त्यांच्या घरात जल्लोष आहे. सगळेच भावुक झाले आहेत. मात्र मोठी जबाबदारी आता ठाणे पालिका सभागृहात त्यांना पार पाडायची आहे.
अटीतटीच्या लढतीत खुस्पे यांनी 667 मतांनी विजय खेचून आणला
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे. पण आता याच बालेकिल्ल्यात आणि त्यातही शिंदेंचं निवासस्थान असलेल्या प्रभागातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडून नव्या दमाच्या शहाजी खुस्पे यांनी उमेदवारी मिळवली. नुसती मिळवलीच नाही,तर समोर वैती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचं आव्हान असतानाही तो भिडला, लढला आणि सरतेशेवटी जिंकल्याचंही त्यांनी सांगितलं. शहाजी खुस्पे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 12 हजार 860 मते मिळवली,तर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांना 12 हजार 193 मतं मिळाली. या अटीतटीच्या लढतीत खुस्पे यांनी 667 मतांनी विजय खेचून आणला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.