महायुतीला मुंबईत काठावरचं बहुमत, एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली, महापौर कोणाचा होणार?
बीएमसी निवडणूक 2026 मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या संपर्कामुळं शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतील ताज लँडस मध्ये ठेवण्यात आले आहेत. ठाकरेंच्या हालचालींमुळं शिंदेंना धोका किंवा संधी मिळेल, अशा चर्चा सुरु आहेत. बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांसाठी देखील शिवसेना आग्रही राहू शकते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे मुंबई महापौरपदाची मागणी करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची गरज आहे. भाजपकडे सध्या 89 नगरसेवक आहेत तर शिदेंच्या शिवसेनेकडे 29 जागा आहेत. मुंबई महापालिकेत 227 जागा असल्यानं बहुमतासाठी 114 संख्याबळ आवश्यक आहे. यामुळं भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज असल्याचं दिसून येतं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यानं या कालावधीत मुंबईचं महापौरपद शिवसेनेकडं असावं अशाही चर्चा आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 92 जागा लढल्या होत्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 89 नगरसेवक मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक विजयी झाले आहेत. मनसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या तर एमआयएमला 8 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले. अनेकांशी चर्चा सुरु आहे, आम्ही तटस्थपणे हालचालींकडे पाहत आहोत, पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडताहेत. तुमचं बहुमत किती मोठं असो किंवा छोटं असुद्यात बहुमत हे चंचल असतं. तुम्ही नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार आहात. तुमचे नगरसेवक मूळचे शिवसेनेचे आहेत, आम्हाला जे संदेश येत आहेत त्यांच्या मनात मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगती आहे. भाजपचा महापौर व्हायचा नाही हे सर्वांनी ठरवला आहे. तुम्ही नगरसेवकांना कोंडून ठेवलं असलं तरी संदेश येत असतात, असं संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.