भाजपच्या राणाजगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांना सक्षणा सलगरांच खुले चॅलेंज, म्हणाल्या..

धाराशिव बातम्या: भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांचं जन्मगाव असलेल्या धाराशिवच्या (Dharashiv News)  तेर गटात हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. याच गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविलेल्या भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय सक्षणा सलगर यांनी शड्डू ठोकला आहे. घराणेशाहीच्या विरोधात सामान्य उमेदवार असला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा असून लोकांच्या आग्रहाखातर तेर गटातून निवडणूक लढणार असल्याची घोषणाच सलगर यांनी केली आहे.

दरम्यानआपण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची दावेदार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केले असून एखाद्या सामान्य गृहिणीला ते पद मिळाले पाहिजे, असे सांगत अर्चना पाटलांनीही मी अध्यक्षपदाची दावेदार नाही, अशी घोषणा करावी असं खुलं चॅलेंजच सक्षणा सलगर यांनी दिल आहे. सक्षणा सलगर यांनी तेर गटातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आगामी काळात जिल्हा परिषदेच्या या गटात जोरदार राजकीय घमासान होण्याची शक्यता आहे.

Parbhani : परभणीत जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेची युती होणार; दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते जागावाटप ठरवणार

परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपमधील युती तुटल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. आज परभणीच्या फर्न हॉटेलमध्ये शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड तर भाजपकडून मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्रित बसून महायुती संदर्भात जागावाटप ठरवणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे ठरलं आहे. नेमक आता जिल्हा परिषदेतील 54 जागांपैकी कोण किती जागा घेतय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार देत निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे.

Tanaji Sawant: शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य

शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप  आमदाराच्या खिशात असल्याचं वक्तव्य शिंदेंचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलंय. धाराशिवमध्ये आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. यावेळी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातही तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्यासाठी अनुकूल असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कळंब नगर परिषदेत भाजप शिवसेना युती झाली. मात्र भूम, परंडा नगरपरिषदेमध्ये भापकडून सर्वपक्षीयांसोबत मिळून तानाजी सावंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे या अंतर्गत कलहाचे आणि राजकीय समीकरणांचे आगामी काळात नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.