मालाड हत्या प्रकरण! लोकलमधील वाढत्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र उपाययोजना कधी?

मुंबई मालाड क्राईम न्यूज : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाची पोटात धारदार शस्त्र खुपसून हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) या तरुणाला अटक केली होती.  लोकलमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाली होती. मालाड स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे लोकलमधल्या वाढत्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असला, तरी त्यावरचा उपाय मात्र अद्याप दृष्टीपथात दिसत नाही.

मुंबईची लोकल आणि गर्दी हे आजवर कधीच कुणालाच न सुटलेलं गणित

मुंबईची लोकल आणि गर्दी हे आजवर कधीच, कुणालाच न सुटलेलं गणित आहे. गर्दी म्हटली की वाद, भांडणं, अपवाद म्हणून हाणामारी हे एव्हाना मुंबईकरांच्या अंगवळणी पडलं आहे. पण शनिवारी मालाडमध्ये जे घडलं, त्यामुळे मुंबईला जबरदस्त हादरा बसला आहे. गाडीतून खाली उतरताना झालेल्या किरकोळ वादातून एका प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रा. आलोक सिंग हे विलेपार्ले इथून मालाडला जाण्यासाठी निघाले होते. मालाड स्थानक जवळ आल्यानंतर ओंकार शिंदे याच्याशी धक्का लागण्यावरून प्रा. सिंग यांचा वाद झाला होता. दोघेही मालाडला खाली उतरल्यानंतरही त्यांच्यात बाचाबाची सुरूच होती. त्यानंतर ओंकारनं धारदार शस्त्रानं प्रा. सिंग यांच्यावर हल्ला केला. पोटात शस्त्र खुपसलं गेल्यामुळे प्रा. सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र, त्यांना मृत्यू म्हणून घोषित केलं.

सीसीटीव्ही फूटेजची मदत घेऊन आरोपीला 12 तासांत बेड्या

प्रा. सिंग यांच्यावर हल्ला केल्यानंतर तिथं उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन ओंकार पळून गेला. दरम्यान प्रा. सिंग यांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फूटेजची मदत घेऊन आरोपीला 12 तासांत बेड्या ठोकल्या.

कोर्टानं आरोपी ओंकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी ओंकार शिंदेला कोर्टात हजर करण्यात आलं. गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यार आणि हल्ल्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टात केली आहे. अद्याप आरोपीने गुन्ह्याचे हत्यार जमा केलेले नाही
एकाच ठिकाणी राहत होते त्यामुळे वैमनस्य आहे का? हे बघणे बाकी आहे. हत्यार कुठून आणलं याचा तपासही सुरु आहे. बाचाबाची झाली पण त्यातून खून झाला हे गंभीर आहे. आरोपीच्या वकिलांनी हा युक्तिवाद फेटाळत जामीन देण्याची विनंती केली आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपी ओंकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

हल्ल्यानंतर आरोपी पळून कसा गेला? पोलिसांनी निलंबीत करण्याची नातेवाईकांची मागणी

दुसरीकडे हल्ल्यानंतर आरोपी पळून कसा गेला, असा सवाल करत प्रा. सिंग यांच्या नातलगांनी करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. आलोक सिंग हे एक साधे माणूस होते, प्राध्यापक होते. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, रेल्वे स्थानकावर उघडपणे चाकूने वार करून पळून जात आहे आणि रेल्वे पोलिसांनी काहीही केले नाही. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना प्रथम निलंबित करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ओंकार शिंदे आणि प्रा. सिंग यांच्या वादाचं मुख्य कारण हे गर्दी आहे

लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे. चेंगराचेंगरी होते किंवा गाडीतून पडून माणसं मरतात. तेव्हा आपली नेतेमंडळी गर्दीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या आणाभाका घेतात. पण त्यानंतर प्रत्यक्षात काहीच घडत नाही. पुन्हा माणसं मरतात आणि मग पुन्हा तीच आश्वासनं दिली जातात. ओंकार शिंदे आणि प्रा. सिंग यांच्या वादाचं मुख्य कारण हे गर्दी आणि त्यामुळे लागलेला धक्का हेच असल्याचं सकृतदर्शनी दिसतंय. ओंकारनं चाकू मारला की नाही, हे यथावकाश कोर्टात सिद्ध होईलच. पण प्रा. सिंग हा मुंबई लोकलमधल्या गर्दीनं घेतलेला आणखी एक बळी म्हणायचा का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mumbai Crime Malad Railway station: मालाड रेल्वे स्थानकात आलोक सिंहला चाकू भोसकून संपवलं, वडील राजनाथ सिंहांच्या ताफ्यातील कमांडो, आरोपी ओंकार शिंदेचा जुना राग?

आणखी वाचा

Comments are closed.