जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजा
जळगाव : चित्रपटात दाखवतात अशा घटना अनेकदा आपल्याला समाजात घडताना पाहायला मिळतात. तर, काहीवेळा चित्रपटालाही लाजवेल असे थरारक प्रसंग असतात. जळगावमध्येही (Jalgaon) अशीच सिनेस्टाईल अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करून तब्बल 20 लाखांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. मात्र, चित्रपटाला लाजवेल अशा वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस (Police) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मामा-भाच्याची सुटका केली. गणपतलाल माळी असं अपहरण करण्यात आलेल्या भाच्याचं नाव आहे.
गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. त्यानुसार, मामा-भाचे पार्सल पाहण्यासाठी गेले असता, ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले. जुन्या चित्रपटातील अपहरणस्टाईलने हे अपहरण करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली होती. विशेष म्हणजे मामालाही चाकूचा धाक दाखवत बसविण्यात आले. “तू मला मारण्याची सुपारी दिली,” असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. त्यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलिस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर 20 लाख रुपये घेऊन ये, असा दम आरोपींकडून देण्यात आला. म्हणजेच, भाच्याला सोडवण्यासाठी 20 लाखांची खंडणीच मागण्यात आली होती.
प्रसंगावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेत तक्रार दिली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी तत्परता दाखवत गणपतलाल यांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होत आहे.
हेही वाचा
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
आणखी वाचा
Comments are closed.