पात्र लाडक्या बहि‍णींच्या संख्येत मोठी घट, ई केवायसीनंतर लाभार्थी संख्या 86 लाखांनी घटली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ई केवायसी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे. यासंदर्भात भारताचा काळ या इंग्रजी वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्रात सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. डिसेंबर महिन्याचा लाभ 1 कोटी 60 लाख महिलांना दिला गेला असल्याची माहिती आहे. म्हणजेच लाभ मिळणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांच्या संख्येपैकी 1 कोटी 90 लाख महिलांनी ई केवायसीसाठी अर्ज केला आहे. याचाच अर्थ 2 कोटी  46 लाख महिला लाभार्थ्यांपैकी 55 लाख महिला लाभार्थ्यांकडून ई केवायसी करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेच्या 1 कोटी 60 लाख महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी केल्यानं त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आल्याची माहिती आहे. ज्या 1 कोटी 90 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी ज्यांच्याकडून पर्याय निवडण्यात चूक झाली आहे,त्यांना ई केवायसी दुरुस्त करता येईल. ई केवायसी दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे.

ई केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात.  तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात. महायुतीमधील पक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते कधी पूर्ण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना  डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान देण्यात आला होता. आता, लाडक्या बहिणींकडून जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. महायुती सरकार सत्तेत येण्यास ही योजना कारणीभूत ठरली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरण्यासाठी संबंधित कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ज्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय  नोकरीमध्ये नसावा. याशिवाय संबंधित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन नसावं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.