तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 78 लाखांना चुना, धुळ्यातील प्रकाराने पोलीसही चक्रावले
धुळे क्राईम न्यूज : धुळे शहरातील काही तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात दोन वेगवेगळे गुन्हे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या दोन्ही प्रकरणांमधील एकूण फसवणुकीची रक्कम सुमारे 78 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने पोलिसही (Police) चक्रावले आहेत.
Dhule Crime News: बनावट नियुक्तीपत्र देत 61 लाखांची फसवणूक
या प्रकरणी वेदांत संजय मोराणकर (रा. अंबिका नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही अनोळखी व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क साधून सरकारी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेदांत मोराणकर, त्यांचे बंधू तसेच ओळखीचे वाळके आणि जयेश शरद खोंडे यांनी संबंधितांशी व्यवहार केला.
संशयितांनी आरोग्य विभाग, आयकर विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याची बनावट आदेशपत्रे पोस्टाने, ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. या बदल्यात वेदांत मोराणकर यांच्याकडून 39 लाख 74 हजार 500 रुपये ऑनलाईन तर 22 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. अशा प्रकारे एकूण 61 लाख 74 हजार 500 रुपये संशयितांनी उकळले.
हा प्रकार 3 मे 2023 ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान अंबिका नगर येथील त्यांच्या घरातून तसेच ऑनलाईन पद्धतीने घडला. नंतर मिळालेली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासात अडथळा येऊ नये म्हणून संशयितांची नावे सध्या गुप्त ठेवण्यात आली आहेत.
Dhule Crime News: दुसऱ्या प्रकरणात 17 लाखांचा गंडा
दरम्यान, दुसऱ्या घटनेतही सरकारी नोकरीचे आमिष दाखवत मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सोनाली किशोर साळुंखे (रा. सत्संग कॉलनी, गोंदूर रोड, धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणीचा मुलगा रोहित किरण खैरनार याला उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून 17 लाख रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले. तसेच सरकारी नोकरीचे बनावट जॉईनिंग ऑर्डरही देण्यात आले.
नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार रोशन राजाराम सैंदाणे (रा. चित्रा टॉकीजजवळ, सटाणा), तिलकचंद अंबर पाटील, हेमराज तिलकचंद पाटील, प्रतिभा तिलकचंद पाटील (रा. रहिमपूर, ता. शिंदखेडा) तसेच किरण (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 पासून आतापर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Dhule Crime News: दोन्ही गुन्हे एकाच दिवशी दाखल; टोळीचा संशय
धुळे जिल्ह्यात यापूर्वीही सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे चाळीसगाव रोड आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील हे दोन्ही गुन्हे एकाच दिवशी दाखल झाले. वरकरणी हे दोन वेगवेगळे प्रकार वाटत असले तरी फसवणुकीची पद्धत जवळपास सारखी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मागे एखादी संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून गोपनीय पद्धतीने तपास सुरू असून या रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.