गर्लफ्रेंडला दुसऱ्याशी बोलताना पाहिलं, संतापलेल्या तरुणाने बुलढाण्यात मुलीला संपवलं, नंतर बॉडी
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वाडीवऱ्हे (wadivarhe) परिसरात आढळलेल्या तरुणीच्या खुनाचा छडा पोलिसांनी (Police) अवघ्या काही तासांत लावला असून हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि मृत तरुणी दोघेही बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime News: जंगलात आढळला रक्ताने माखलेला मृतदेह
शुक्रवारी नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या (wadivarhe Police Station) हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यात चाकू खुपसलेला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या खुनाचा उलगडा केला.
Nashik Crime News: एका किचेनमुळे मिळाला तपासाला धागा
मृतदेहाजवळ पोलिसांना एक चावी आणि त्याला लावलेले की-चेन आढळले. त्या की-चेनवर “संस्कृती” असे नाव लिहिलेले होते. या छोट्याशा धाग्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. राज्यात ‘संस्कृती’ नावाची कोणती मुलगी बेपत्ता आहे का, याची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील येथील संस्कृती सतीश काळे ही मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
Nashik Crime News: संशयातून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
तपास पुढे नेताना संस्कृतीच्या ओळखीतील देशमुख कुटुंबातील अथर्व देशमुख याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचा शोध घेतला असता तो सिन्नर, कोपरगाव आणि नाशिक शहर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने अथर्व देशमुख आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत अथर्वने अखेर खुनाची कबुली दिली.
Nashik Crime News: इतरांशी बोलताना पाहून राग
चौकशीत अथर्वने दिलेल्या माहितीनुसार, संस्कृती आणि त्याचे प्रेम संबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने खुनाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अथर्व नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो, तर संस्कृती अकोला जिल्ह्यात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अथर्व बुलढाण्यात घरी गेला होता. त्याने मित्रासोबत फिरायला जाण्याचे कारण सांगत संस्कृतीला कारमध्ये बसवले. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याने गाडीतच तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले.
Nashik Crime News: मृतदेह नाशिकमध्ये आणून टाकला
खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सुचत नसल्याने आरोपीने नाशिककडे धाव घेतली. त्याने मृतदेह वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात टाकून दिला.
Nashik Crime News: काही तासांत पोलिसांनी उलगडले गूढ
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रेमसंबंधातून घडलेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.