रायगडमध्ये शिवसेनेला वेगळं ठेवण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा डाव, महेंद्र दळवींचा आरोप
महेंद्र दळवी: जिल्हा परिषेदत सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रायगडमध्ये शिवसेनेला वेगळं ठेवण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. जनाधार आमच्याकडे असल्याचेही दळवी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य निर्णय घेतील आणि हे समीकरण बदललेले पाहायला मिळेल असेही ते म्हणाले.
महायुती धर्म पाळून आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र
महायुती धर्म पाळून आम्ही केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत असे दळवी म्हणाले. कारण विधानसभा लोकसभेला आम्ही एकत्र होतो. त्यामुळं आम्हाला योग्य न्याय मिळेल, कोणी कितीही ताकद लावली तरी याबाबत वरिष्ठांचा निर्णय होईल असेही दळवी म्हणाले. कितीही झालं तरी शिवसेनेला अध्यक्ष पद मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे गट नोंदणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत असल्याने तिसऱ्या पक्षाला सत्तेत समावून घेण्याची गरज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. तरीपण सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेनी वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानुसार या निवडणुकीत महायुतीने रायगडमध्ये (Raigad News) वर्चस्व राखले असून ठाकरे गट आणि काँग्रेसला अत्यंत माफक यश मिळाले.
आमची गरज नसेल तर यापुढे आम्ही वेगळा विचार करु : मंत्री भरत गोगावले
रायगड जिल्हा परिषदेत शिंदे सेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच मुद्यावरुन मंत्री भरत गोगावले आक्रमक झाले होते. त्यांनी दोनच दिवसापूर्वी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. महायुती मध्ये एकत्र यायचे असेल तर एकत्र जाऊ, अन्यथा पुढे वेगळा विचार करु, अशा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिला आहे.
आमची गरज नसेल तर यापुढे आम्ही वेगळा विचार करु असा सज्जड इशारा मंत्री भरत गोगावले यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपला दिला आहे. रायगडमध्ये शिंदेसेनेला सत्ते पासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करत आहेत. यावर गोगावले यांनी शिवसेनेची बाजू मांडत युती पक्षांना इशाराच दिला आहे. महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचे आहे असा सल्ला गोगावले यांनी यावेळी दिला. त्यामुळं वरिष्ठ गोगावले यांच्या वक्तव्याचा किती विचार करतील हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या अनुशंगाने रायगडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलचं तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.