परीक्षेच्या आधीच XII व्हॉट्सअॅप ग्रुपवर बारावीचा पेपर फुटला, खासगी शिकवणीच्या शिक्षकाकडे बोट
नागपूर : शहरात बारावी (HSC) परीक्षेतील पेपर फुटल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर बारावीच्या विज्ञान शाखेतील केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोन विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रसारित झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर शेअर (HSC Paper Leak via WhatsApp)
मिळालेल्या माहितीनुसार, ‘XII’ नावाने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी केमिस्ट्रीचा पेपर अपलोड करण्यात आला होता. परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे तासाभर आधीच पेपर ग्रुपवर फिरत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
स्वच्छतागृहात मोबाईल वापराचा संशय (Exam Centre Vigilance)
एक विद्यार्थिनी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्रातील स्वच्छतागृहात गेली होती. ती परत येण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्याने पर्यवेक्षकांना संशय आला. चौकशीत तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. मोबाईल तपासल्यावर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर आल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीचे नाव सांगितले. तिच्या बॅगेतूनही मोबाईल सापडला असून ती देखील त्याच ‘XII’ व्हॉट्सअॅप ग्रुपची सदस्य असल्याचे स्पष्ट झाले.
खासगी शिकवणी शिक्षकावर आरोप (Private Tuition Teacher Angle)
प्राथमिक चौकशीत दोन्ही विद्यार्थिनींनी खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याचा आरोप केला आहे. मात्र, या ग्रुपचा प्रत्यक्ष किती वापर झाला आणि आर्थिक व्यवहार झाले का, याचा तपास सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली.
21 विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप (HSC Exam Investigation)
‘XII’ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एकूण 21 विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रुपमधील इतर विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते. सर्व सदस्यांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. शहरात असे आणखी किती व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत होते, याचाही तपास सुरू आहे.
सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बदली (Action by Authorities)
या गंभीर प्रकारानंतर सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रप्रमुखांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात डॉ. शिवलिंग पटवे यांनी सांगितले की, “प्राथमिक तपास सुरू असून संबंधित सर्व विद्यार्थ्यांची आणि इतर व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. पेपर फुटल्याच्या घटनेत कोणाचा सहभाग आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल.”
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.