एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक ठरले, नाराज आमदाराच्या मुलाला लागली लॉटरी
BMC Swikrut Nagarsevak: मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना आघाडीचा महापौर बसल्यानंतर विविध समित्या आणि स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाले होते. स्वीकृत नगरसेवक (Swikrut Nagarsevak) म्हणून आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेकांनी पडद्यामागून प्रयत्न सुरु केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) मुंबईत 29 नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकपदं येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहेत. (Mumbai Mahangarpalika Election 2026)
हे दोन्ही स्वीकृत नगरसेवक मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. यामध्ये माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांचा समावेश असल्याचे समजते. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र कागदपत्रांच्या त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यावेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. ही शक्यता खरी ठरली आहे.
प्रकाश सुर्वे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला मागाठाणे परिसरातून उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, याठिकाणी भाजप आणि शिवसेनेत प्रचंड रस्सीखेच असल्याने प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आले होते. यामुळे प्रकाश सुर्वे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचा मुलगा राज सुर्वे याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
याशिवाय, मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी बेस्ट आणि सुधार या दोन समित्यांचे अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेना पक्षाला देण्यात आले आहे. सुधार समितीसाठी मागाठाणेमधील नगरसेविका संध्या दोषी यांना, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी वडाळामधील नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांना संधी देण्यात आली आहे. आज या दोन्ही समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सुधार आणि बेस्ट समितीचे अध्यक्षांची ही आज बिनविरोध निवड करण्यात येईल. मुंबई महापालिकेतील महापौर पदासह चारही समित्यांच्या अध्यक्षांची निवड ही बिनविरोध झाली आहे.
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक, एमआयएमचे 8 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.