दादांनी माझे शेणाचे हात पेनाला लावले, अजित पवारांना देव मानणाऱ्या मिटकरींचं डोळे पाणावणारं भाषण

विधानसभेत अजित पवारांच्या शोकसभेवर अमोल मिटकरी : अजित पवार यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं होतं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. मला कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला आमदार केले, असे उद्गार आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काढले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अजितदादांना त्यांना कशाप्रकारे राजकारणात आणले आणि सामान्य व्यक्तीपासून ते आमदार कसे केले, याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. (Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026)

महाराष्ट्राला एका धडाकेबाज नेतृत्त्वाला मुकावं लागलं. मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. आमच्या घरात कुठलाही राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांनी, आजोबांनी, खानदानात कोणाला ग्रामपंचायत सदस्यत्व काय असतं हे माहिती नव्हतं. 2019 साला बारामतीच्या शारदा प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्यानिमित्ताने एका व्याख्यानाचा योग आला. मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता. त्यादिवशी दादा उद्घाटन करुन जाणार होते. त्यांनी कार्यक्रमाचा विषय वाचला, वक्त्याचं नाव वाचलं, मला म्हणाले, तुम्ही कुठे असता, मी म्हटलं अकोल्यात असतो. तुम्ही काय करता विचारलं, मी म्हटलं, मी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांचा विचार मांडणारा वक्ता आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, असे मी त्यांना सांगितलं. चळवळीबद्दल नितांत आदर असणाऱ्या दादांनी माझ्या व्याख्यानाचा विषय विचारला.

माझ्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी आयोजकांना विनंती केली की, दादांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करुन निघून जावे. पण दादांना कोणीतरी सांगितलं की, संभाजी महाराजांचं चरित्र या व्यक्तीच्या तोंडातून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो. दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. दोन तास 15 मिनिटे दादांनी भाषण ऐकलं. भाषणानंतर तीन महिन्यांनी मला दौंड शुगर कारखान्यातून त्यांच्या स्वीय सहायकाचा फोन आला. त्यावेळी दादांनी म्हटलं, मी तीन महिन्यांपूर्वी बारामतीत तुमचं व्याख्यान ऐकलं, संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही. तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या, मला पक्ष कार्यालयात भेटा. त्यावेळी पक्ष कार्यालय बॅलार्ड पिअरला होतं, त्यादिवशी ते बंद होते. मग मला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांच्या घरी ढिकले साहेबांनी अजितदादांच्या भेटीचा वेळ दिला. अजितदादांनी मला विचारलं की, आमच्या पक्षात येणार का, काम करणार का?  मी म्हटलं, माझा राजकारणाशी संबंध नाही, तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो. त्यावेळी जयंत पाटील, भुजबळ साहेब तिकडे होते.

जयंत पाटील म्हणाले की, बुथ बांधणीचा कार्यक्रम हाती घ्या. तेव्हा दादा मिश्कील हसून म्हणाले की, हा बुथ बांधणीच्या कामाचा माणूस नाही. हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो. त्यामुळे याला आपण महाराष्ट्रभर आपण फिरवूया. शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेब, उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात निघाली होती. त्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होण्यासाठी दादांनी मला सांगितलं. त्याचदिवशी पक्षातील अनेक लोक दुसऱ्या पक्षात गेले होते. त्यावेळी मी अमोल कोल्हेंसोबत महाराष्ट्रभर फिरलो. त्यानंतर तीन महिन्यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. तेव्हा लोकांनी प्रचारसभेसाठी माझी मागणी केली. मला त्यावेळी महाराष्ट्र गाजवता आला, दादांसोबत फिरता आलं, 68 सभा मला मिळाल्या. तेव्हा दादांनी मला पक्षाचा प्रचार करायला हेलिकॉप्टरची व्यवस्था करुन दिली. मी आणि जयंत पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा आमचे बरेच आमदार निवडून आले. मात्र, दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा 650 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी पराभवाचा मेळावा घेतल्यावर दादांनी म्हटलं की, एखादी सभा धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हेंची झाली असती तर 700 मतांचा फरक निघाला असता. तेव्हा कार्यकर्त्यांनी म्हटलं की, आता विधानसभा गेली तर जाऊ द्या, आता त्यांना विधानपरिषदेत संधी द्या. तेव्हा दादा चिडले. तेव्हा दादांच्या तोंडून आपसूक निघालं की, तुम्हाला विधानसभेत संधी देतो, त्यामध्ये निवडून येत नाही आता विधानपरिषद मागता. आता नाही, ते पोरगं लय फिरलंय, पक्षासाठी जीवाचं रान केलंय, मी करेन तर आमदार त्यालाच करेन. ती बातमी टीव्हीवर आली, तेव्हा अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात होतो. तेव्हा मला सुखद धक्का बसला, अशी आठवण अमोल मिटकरी यांनी सांगितली.

आणखी वाचा

अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला!

आणखी वाचा

Comments are closed.