Video: बारामती विमान अपघातावर तुम्हाला शंका वाटते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात सहभागी होत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) निधन, मुंबई महापालिका, परप्रांतीय मुद्दा, पायाभूत सुविधा, महायुतीतील मनभेद, महाराष्ट्राचं राजकारण, वाहतूक कोंडीसह रॅपिड फायरच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. अजित पवारांचा अपघात हा घात आहे का? या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

राज्यात अजित पवारांच्या निधनानंतर संशयाचे धुके निर्माण झाले असून आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्या व्हीआरएस कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांच्याकडून होत आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर, आज रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यातच, राज ठाकरेंनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात आपली भूमिका मांडली.

अजित दादा माझे चागंले मित्र होते. राजकारणाची सर्वात चांगली समज असलेले ते नेते होते, त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नव्हता. राजकीय गरज ओळखून ते निर्णय घेत होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून देखील त्यांचं योगदान महत्त्वाचं राहिलं आहे. विमान दुर्घटनेच्या एक दिवस आधीच आम्ही दोघांनी एकत्रितपणे अनेक विषयांवर चर्चा केली होती. त्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाचा सर्वांनाच धक्का बसलाय. मात्र, पुढे जावं लागतं, तसं आम्ही पुढे जात आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा

सुनेत्रा पवारांनी 4 थ्या दिवशीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तुम्ही शरद पवारांना संधीच दिली नाही, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, हा राँग नंबर आहे, राष्ट्रवादी पक्ष त्यांचा आहे, आमचा नाही. राष्ट्रवादीने एकत्र येत त्यांचा निर्णय घेतला, त्यांनीच तारीख निश्चित केली होती. त्यानंतर, माझ्याकडे ते सर्वजण आल्यानंतर मी त्यांना सहमती दर्शवली, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी खुर्ची सांभाळली, हे उदाहरणही दिले.

विलिनीकरणावर स्पष्टीकरण

विलिनीकरणाच्या मुद्द्यावरील व्हायरल व्हिडिओसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, तो व्हायरल व्हिडिओ बारामतीमधील एआय अॅग्रीकल्चर प्रदर्शनाच्या बैठकीसंदर्भातील होता. दोन्ही गटाच्या नेत्यांनी ते मान्य केलं आहे. विलिनीकरण करायचं असेल तर अजित पवारांनी आमच्यासोबत चर्चा तरी केली असते. माझ्यासोबत त्यांचं तसं कुठलंही बोलणं झालं नव्हतं, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

विमान दुर्घटनेवर तुम्हाला संशय वाटतो का?

रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. तर, ह्या अपघातावर तुम्हाला संशय वाटतो का? असाही प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा आपण कुठलीही पतंगबाजी करायला नाही पाहिजे. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद-प्रतिष्ठेचाही विचार आपण करायला पाहिजे. तसेच, कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे, याविषयी कुठलीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करायला नाही पाहिजे, असे मला वाटते, अशा शब्दात फडणवीसांनी उत्तर दिले. त्यामुळे, याप्रश्नावर मी अधिक बोलू इच्छित नाही.

हेही वाचा

रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप, सुनिल शेळकेंचाही पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.