मोठी बातमी! महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता करात 700 स्क्वेअर फूटापर्यंत करमाफी
मुंबई : बीएमसी म्हणजेच मुंबई महापालिकेत महायुतीने मोठा निर्णय घेतला असून मुंबईतील (Mumbai) घरांसाठी मालमत्ताकर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नव्या ठरावानुसार मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी एकमताने हा निर्णय झाला. त्यामुळे, मुंबईकरांना महापालिकेतील नव्या महायुतीकडून, नव्या महापौरांकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महापालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी, जाहीरनाम्यात शिवसेना-मनसे युतीकडूनही मालमत्ता करात (home) 700 चौरस फुटापर्यंत सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना यापूर्वी 500 चौरस फूटापर्यंतच्या घरासाठी कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. मात्र, आता हीच मर्यादा 700 स्क्वेअर फूटापर्यंत वाढवण्यास महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन मालमत्ताकर सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे.
“मुंबईतील झोपडपट्टी व चाळींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबियांना खाजगी विकासकामार्फत झोपडपट्टी व चाळींचा पुनर्विकास व समूह पुनर्विकास ह्या योजनेंतर्गत सदनिका मोफत मिळतात. मात्र, मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांना 500 चौ. फुटांच्या सदनिकांचे मालमत्ता कर भरणे देखील परयडत नाही. शिवाय, त्यांना देखभाल व दुरुस्तीचा सार्च देखील गृहनिर्माण संस्थेला भरावा लागतो. कुटुंबियांचे पालनपोषण, औषधोपचार, मुलांचे शिक्षण ह्याकरिता होणारा खर्च आणि त्यात सदनिकेचा मालमत्ता कर व देखभालीचा वाढीव खर्चाचा भार सहन होत नसल्याने, मध्यमवर्गीयांना त्यांच्या सदनिका विकून मुंबई बाहेर स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसतो. मूळ मुंबईकर मुंबईतच राहावा आणि त्यांच्यावर मुंबई सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून, मालमत्ता कर माफी असलेल्या 500 चौ. फुटांची मर्यादा वाढविणे हे नितांत गरजेचे आहे: ही वस्तुस्थिति लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, बृहन्मुंबई क्षेत्रातील 700 चौ. फुटापर्यंत निवासी सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असे या ठरावात म्हटले आहे. उपरोक्त परिच्छेद 1 मध्ये व्यक्त केलेल्या मताच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे यथोचित निवेदन सादर करण्याची महापौरांना विनंती करण्यात यावी.”, असेही या ठरावात म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या यशोधर फणसे यांनी सभागृहात ही सूचना केली होती. आता हा प्रस्ताव पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर तो विधी व कायदे विभागाकडे जाईल. सर्व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल. आयुक्तांची सही झाल्यानंतर अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल आणि 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत लागू होईल. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
आणखी वाचा
Comments are closed.