लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत ग

राज्यसभा निवडणूक 2026: महाराष्ट्रातील सात राज्यसभा (Rajya Sabha Election 2026) जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सातपैकी एक जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rajya Sabha Election 2026: पराभवानंतर पुनरागमनाची संधी?

2024 साली नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेच्या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी विजय मिळवला होता. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजार मतांनी पराभव झाला होता. सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याची त्यांची संधी हुकली. महायुतीकडून उमेदवारी देण्यात झालेल्या विलंबामुळे त्यांना फटका बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तरीही दोन टर्म खासदार म्हणून संसदेत काम केल्याचा हेमंत गोडसे यांना अनुभव आहे.

Kumbh Mela 2027: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अस्तित्व मजबूत राहावे, अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची भावना आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत शिंदे गटाची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी समन्वय राखण्यासाठी अनुभवी चेहरा राज्यसभेत असावा, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मिळत आहे.

Hemant Godse: गोडसे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या चर्चांबाबत हेमंत गोडसे यांनी सावध भूमिका घेतली आहे. “अद्याप पक्षाकडून कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जे ठरवतील, तोच अंतिम निर्णय असेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Who is Hemant Godse: कोण आहेत हेमंत गोडसे?

हेमंत गोडसे यांचा जन्म 3 ऑगस्ट 1970 रोजी झाला असून ते नाशिक तालुक्यातील संसरी या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा जुना आहे. 1996 मध्ये याच गावातील गोडसे कुटुंबातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे खासदार झाले होते. त्यामुळे राजाभाऊ गोडसे यांचे राजकीय वारसदार म्हणून हेमंत गोडसे यांच्याकडे पाहिले जाते.

व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले हेमंत गोडसे हे बांधकाम क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2007 ते 2012 या कालावधीत ते एकलहरे (ता. नाशिक) येथील जिल्हा परिषद सदस्य होते. 2008 मध्ये ते सिनेट सदस्यपदाच्या निवडणुकीतही विजयी झाले.

2009 मध्ये त्यांनी मनसेच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2012 मध्ये नाशिक महापालिकेच्या विहितगाव प्रभागातील पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी मिळवत 4,94,375 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा पराभव केला. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत 5,63,599 मते घेत समीर भुजबळ यांना पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा खासदार झाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या 13 खासदारांमध्ये हेमंत गोडसे यांचा समावेश होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा तब्बल एक लाख साठ हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

आणखी वाचा

BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार

आणखी वाचा

Comments are closed.