पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण

पुणे : शहरातील शैक्षणिक क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली असून सिंहगड डेंटल कॉलेजमधील विभागप्रमुखांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटही सापडली आहे.(Pune Sinhgad Dental College Professor Raju Patil end his life)

आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव राजू पाटील असे असून ते सिंहगड डेंटल कॉलेज येथे विभागप्रमुख (एचओडी) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांसह सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्या वेळी पाटील यांच्या पत्नी घरी परतल्या असता त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.(Pune Sinhgad Dental College Professor Raju Patil end his life)

प्राथमिक तपासात घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण हेच आहे की आणखी काही कारणे आहेत, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिंहगड डेंटल कॉलेजवर शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती. शिक्षकांचे थकीत वेतन, तसेच शैक्षणिक कामकाजातील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली होती.

विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप महाविद्यालयावर ठेवण्यात आला होता. तसेच विद्यापीठाने निश्चित केलेल्या शैक्षणिक दर्जानुसार महाविद्यालयाचे कामकाज होत नसल्याचे आढळल्याने दंतविद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही असंलग्नित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांच्या सुसाईड नोटमध्ये कामाच्या ताणाचा उल्लेख आढळल्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील तपासानंतरच आत्महत्येमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.