केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण
बीड क्राईम न्यूज : बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई येथे नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वसतीगृह चालकाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ एक हजार रुपयांचे शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून ही अमानुष मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी (Police) वसतीगृह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू जाधव यांचा मुलगा गेवराईमधील सूर्योदय निवासी वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जाधव यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठ्या कष्टाने वस्तीगृहाचे शुल्क भरले होते.
Beed Crime News: विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण
चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहाचे एकूण 39 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी बाळू जाधव यांनी 38 हजार रुपये भरले होते. मात्र केवळ एक हजार रुपये थकीत राहिले होते. या थकीत रकमेवरून वसतीगृह चालक सुरेश राठोड हा वारंवार पैशांसाठी तगादा लावत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शुल्क वेळेवर न दिल्याच्या कारणावरून सुरेश राठोड याने संबंधित विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थी प्रचंड घाबरून गेला. घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Beed Crime News: वसतीगृह चालकाविरोधात गुन्हा दाखल
पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गेवराई पोलीस ठाणे येथे वसतीगृह चालक सुरेश राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ एक हजार रुपयांसाठी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याने नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
Beed Crime News: विवाहितेवर अत्याचार करून गावच्या चावडीत बांधून ठेवले
दरम्यान, बीड जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसोबत घरी झोपलेली असताना आरोपीने घरात घुसून तिला जबरदस्तीने गावाबाहेर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने तिला गावच्या चावडीवरील खांबाला बांधून ठेवले. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महिलेची सुटका केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी वैभव पटेकर या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.