लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

पुणे : राज्यातील दोन विधानसभा (विधानसभा) मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघात काहींनी निवडणूक (Election) लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला. आता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी भूमिका मांडली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाकेंच्या या भूमिकेवर आता पवार कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसंदर्भाने बोलताना, याबाबत सुप्रियाताईंनी भूमिका मांडली आहे, बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीने सोडवू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. तर, लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.  प्रत्येकाला निवडणुकी लढण्याचा अधिकार आहे, कोणी कुठेही निवडणूक लढू शकतो, ही लोकशाही आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.

गॅस टंचाईवर भूमिका मांडली (Gas shortage)

अजित दादा आणि साहेबांनी बारामतीत कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांची आठवण काढली. तसेच, राज्यात घरगुती गॅसची टंचाई होत असून नाव नोंदवून 40 दिवस झाले, तरीही लोकांना गॅस मिळत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. यासह बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरही त्यांनी भूमिका मांडली.

विलिनीकरणाचे माहिती नाही (NCP collaboration)

युगेंद्र पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलणे टाळले, सुनेत्रा काकी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. विलीनीकरणाबाबत मला सद्यपरिस्थितीत माहित नाही, ते होणार की नाही हे मला माहिती नाही, असेही युगेंद्र यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके

आणखी वाचा

Comments are closed.