मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहनमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
मुंबई : एस.टी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर (नोकरी) आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल. नियमित कर्मचाऱ्यासाठी अर्थ खात्याकडे अर्ज पाठविण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, तोपर्यंत या बसेस चालाव्या म्हणून ही कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम करताना चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगारस्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीतून दिले आहेत.
एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांची काल सकारात्मक चर्चा झाली. यावेळी, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यानंतर, आज विधानसभेत बोलताना त्यांनी नव्याने कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सांगितले. लवकरच मुंबईत 30 स्लिपींग कोच बसेस असतील तर 170 बैठ्या खुर्च्यांच्या वोल्वो बसेसही दाखल होती, या दोन्ही प्रकारच्या बसेस मुंबईसाठी मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आम्ही लवकरच 8300 बसेस समाविष्ट करणार आहोत. त्यासाठी, एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल, असे सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.
महायुती सरकारने एसटीतील प्रवाशांबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा केली होती. यानंतर राज्यातील महिलांना हाफ तिकिटात एसटीचा प्रवास करता येईल, अर्थात अर्ध्या तिकिटात महिलांना प्रवास करण्याची मुभा दिली. यानंतर आता एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
5012 सहायक्क प्राध्यापक पदांची भरती
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण रिक्त 11,918 पदांपैकी 5012 पदांची भरती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहीती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.