सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची?
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षची निवड उद्या होणार आहे. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यापैकी कोणाकडूनही सत्ता समीकरणाची अजून पर्यंत कोणतीही हालचाल किंवा संकेत देखील देण्यात आलेले नाहीत. साताऱ्यात अत्यंत गोपनीय पद्धतीने सत्ता समीकरणाची चाल खेळली जात आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना गेल्या 35 दिवसांपासून अज्ञात स्थळी ठेवलं आहे. अज्ञात स्थळी असलेले 36 सदस्य उद्या सातारा जिल्हा परिषदेत येऊन सत्ता स्थापन करणार का..? की यातील काही सदस्य फुटून भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साताऱ्याच्या राजकारणात उद्या मोठा स्फोट होणार का…?
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड आणि सत्ता कोणाची…? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या पूर्णपणे सस्पेन्स आणि सिक्रेट गेम सुरू आहे. सत्ता समीकरणांबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिसत नाहीत, मात्र, पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या तब्बल 35 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आपले सदस्य अज्ञात स्थळी ठेवले आहेत. हेच 36 सदस्य उद्या थेट सभागृहात दाखल होत सत्ता स्थापन करणार का…? की शेवटच्या क्षणी गेम पलटणार…? हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे.
भाजप आकडेवारीमध्ये सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी भाजपविरोधी मूठ बांधली आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी सोबत लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना बहुमताची मॅजिक फिगर पार करेल इतकं संख्याबळ दिलेलं आहे. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी आधीच दावा केला होता..”शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत… आम्हाला कोणत्याही प्लॅनची गरज नाही.. मात्र उद्या हा दावा खरा ठरणार का…? की सगळं समीकरण उलटणार…? याकडे सातारकरांचं लक्ष लागलंय.
चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
भाजपनं सातारा जिल्हा परिषद स्वबळावर लढवली होती. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वात भाजपला 27 जागांवर यश मिळालं आहे. एका अपक्षानं भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळं सध्या त्यांचं संख्याबळ 28 वर पोहोचलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा उद्या होणार आहे. उद्या मतदानानंतर दुपारी सर्व चित्र स्पष्ट होईल. सातारा जिल्हा परिषदेत कोण सत्तेच्या गादीवर बसणार…? आणि विरोधी बाकावर कोणाला बसावं लागणार याकडे समस्त सातारकरांचं लक्ष लागलं आहे.
सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : २०
शिवसेना (एकनाथ शिंदे) : १५
काँग्रेस : 01
स्वाभिमानी शेतकरी संघटना :01
अपक्ष: 01
सातारा जिल्हा परिषद सदस्य संख्या : 65
सातारा जिल्हा परिषद मॅजिक फिगर : 33
आणखी वाचा
Comments are closed.