चाकणकरांचं प्रदेशाध्यक्ष राहणार की जाणार, देवगिरीवर राष्ट्रवादीची बैठक, पटेल, तटकरेंची हजेरी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला महिला अत्याचार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केली. यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांना विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळं राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आले होते. रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. विरोधकांनी राष्ट्रवादीनं चाकणकर यांना त्या पदावरुन हटवावं अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची उच्च स्तरीय बैठक सुरु आहे.
चाकणकरांचं प्रदेशाध्यक्षपद राहणार की जाणार?
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला असला तरी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी असून, अनेक स्तरावर ही मागणी होत आहे. या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्टीने या बैठकीला मोठे महत्व निर्माण झालं आहे.
सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यातील बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना रुपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा का असा प्रश्न सकाळी विचारण्यात आला होता. यावेळी पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो, असे छगन भुजबळ म्हणाले.
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याचं पाद्यपूजन करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्या सोबतचे फोटो समोर आले होते. यानंतर विरोधी पक्षातील महिला नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. अखेर काल रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. हा राजीनामा सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं म्हटलं.
अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरु
नाशिकच्या अशोक खरात याला पोलिसांनी अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. तेजस्विनी सातपुते यांच्याकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे.
आणखी वाचा
Comments are closed.