‘तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा’; अशोक खरातचं घटस्फोटीत महिलेसोबत नको ते

अशोक खरात नाशिक गुन्हे: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) आणखी एक कारनामा उघड झाला आहे. धार्मिक विधी, भविष्यकथन आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. “तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस,” अशा गोष्टी सांगून खरातने पीडित महिलेचा विश्वास जिंकला आणि त्याचाच गैरफायदा घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित महिला विवाहित असताना तिच्या संसारात वाद निर्माण झाले होते. या वैयक्तिक अडचणींवर उपाय मिळावा या हेतूने ती खरातच्या कार्यालयात गेली. याच संधीचा फायदा घेत, “मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे”, असे भासवत खरातने महिलेला जाळ्यात ओढले. तिच्या भविष्याबाबत भीती आणि आशा निर्माण करत विविध तांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे.

Ashok Kharat Nashik Crime: पीडित महिला राहिली होती गर्भवती

धक्कादायक बाब म्हणजे या शोषणाच्या काळात पीडित महिला गर्भवती झाली होती. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी खरातनेच आपल्या कार्यालयात बोलावून औषधे दिल्याचा आरोपही समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर “माझ्या नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर,मी तुला व तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल,” असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तो महिलेला सतत फसवत राहिला. 2027 मध्ये लग्न करण्याचे आश्वासन देत, तिच्या भावनांशी खेळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Ashok Kharat Nashik Crime: …नाहीतर तुझा कोप होईल

तसेच, “तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सांगतो ते कर. नाहीतर तुझा कोप होईल आणि तुझ्या मुलांचं देखील बरं वाईट होईल, असे भीती घालत भोंदूबाबा अशोक खरातने पीडित महिलेला धमकी दिल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून, भोंदूबाबांविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Ashok Kharat Nashik Crime: नाशिक पोलिसांनी अशोक खरात दाखवला इंगा

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातला रविवारी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) चांगलाच इंगा दाखवला. गेल्या दोन दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरु होती. काल त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या हवाली करण्यात आले. यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना कॅप्टन अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. अनेक बडे नेते आणि उद्योगपतींना शक्तीवर्धक गोळ्यांचे सिरप वाटणाऱ्या अशोक खरातला काल स्वत:च्या पायांनी चालण्याची ताकदही उरली नव्हती. अशोक खरात दोन पोलिसांच्या साहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पडला. यावेळी दोन पोलिसांनी त्याला धरले होते. अशोक खरात लंगडत आणि कण्हत चालत होता. अलीकडच्या काळात नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य झालेले ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, हे वाक्यही खरातने कसेबसे पुटपुटले. त्यानंतर अशोक खरात पोलिसांसोबत गाडीत जाऊन बसला. तेव्हाही अशोक खरातने स्वत:ची मान शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा

Ashok Kharat Crime : अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा हादरवणारी माहिती, 3 FIR मधून उलगडली विकृतीची कहाणी, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

आणखी वाचा

Comments are closed.