रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीत खदखद वाढली, रुपाली ठोंबरें सुनेत्रा पवारांना भेटणार

NCP on Rupali Chakankar: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics) अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेत महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विषयी आता पक्षातूनच तीव्र नाराजी उमटतांना दिसत आहे.

NCP on Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला डाग

रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिकमधील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात पत्राद्वारे मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला डाग लागला जात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करा अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे. प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष आणि भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत.

Rupali Thombare : राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाही, पक्षाची बदनामी

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणात राज्यातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी आणि रोष असून या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्या आपली भूमिका मांडणार आहेत. रूपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी थेट रूपाली पाटील ठोंबरे आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाही, त्यामुळे नाशिकच्या अनेक महिलांनी राजीनामा देखील दिल्याची माहिती आहे. पक्षात महिलांची गरज आहे आणि त्या सुरक्षित असल्या पाहिजे. अशातच आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी रूपाली पाटील सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.