Sanjay Gaikwad: “माहिती अधिकाराचे ‘हिXX’ धंदे मी करत नाही, घरात चौकशी करा!”; आमदार संजय गायकवाडांची श्वेता महालेंवर जहरी टीका, म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला…’
बुलढाणा/चिखली: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीमधील दोन आमदारांमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. “माहिती अधिकाराचा वापर करून दबाव टाकण्याचे ‘हिजडे’ धंदे मी करत नाही, ते कोण करतंय हे तुमच्या घरात चौकशी करा,” अशा शब्दांत गायकवाड यांनी श्वेता महालेंवर घणाघाती टीका केली आहे.(Sanjay Gaikwad)
नेमकं प्रकरण काय?
चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना, भाजप आमदार श्वेता महाले यांनी गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गायकवाड हे माहिती अधिकाराचा (RTI) धाक दाखवून आणि सरपंचांवर दबाव टाकून पक्षात प्रवेश करून घेत असल्याचा दावा महालेंनी केला होता. याला उत्तर देताना गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला.(Sanjay Gaikwad)
संजय गायकवाड म्हणाले, “आमचे काम सरळ आहे; छातीला छाती भिडवायची आणि विषय संपवायचा. पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला जमत नाही. चिखलीच्या आमदार म्हणतात की मी RTI टाकून दबाव आणतोय, पण असे धंदे मी कधीच करत नाही. हे कोण करतंय, याची तुम्ही तुमच्या घरातच चौकशी करा.” गायकवाड यांनी पुढे इशारा दिला की, “आम्ही चिखलीत आमचा पक्ष वाढवण्यासाठी आणि खासदारांचे मताधिक्य वाढवण्यासाठी आलो आहोत. चिखलीत माझे असंख्य नातेवाईक आहेत, पण माझ्याबद्दल चांगल्या पोस्ट केल्यावर त्यांना धमकावले जाते. आमच्या शिवसैनिकांनी भाजप आमदाराला पाच-सहा वेळा निवडून आणले आहे. आता आमचे कार्यकर्ते काम घेऊन गेले की त्यांना ‘पक्षात प्रवेश घ्या’ असे सांगितले जाते. शिवसेना चिरडायला निघत असाल, तर तो त्रास दूर करायला आम्ही आलो आहोत.”(Sanjay Gaikwad)
जेलमध्ये टाकण्याची धमकी?
“कोणाला जेलमध्ये घालणार आणि कोणाला धमकावणार, हे आता आम्ही पण पाहणार आहोत. चिखलीच्या आमदार काय करतात, हे सर्व आमच्या कानावर आहे. मी काही घरात बसलेला आमदार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात माझे नाव आहे,” अशा शब्दांत गायकवाड यांनी थेट श्वेता महालेंना आव्हान दिले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.