पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण..
गुन्हा ठेवा: नाशिकच्या भोंदू बाबाची चर्चा असतानाच पुण्यात ‘मी महादेवाचा अवतार’ म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पाखंडी बाबाची सध्या एकच चर्चा आहे. स्वयंघोषित धर्म गुरु म्हणणाऱ्या ऋषिकेश वैद्य (Rushikesh Vaidya) या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धेच्या बिळात लपलेल्या अनेक भोंदू बाबांचे कारनामे उघडकीस येत आहेत. दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या भोंदू बाबाचा मोठा भाऊही खोटारडाच निघाल्याचं समोर येतंय. (Pune crime)
ऋषिकेश वैद्यने एका मुलावर अत्याचार केल्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 सालीच या भोंदू बाबाचे कारनामे उघड झाले होते. त्यावेळी एका मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. मात्र, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. तरीही वसईतील काही सामाजिक तरुणांनी या भोंदू बाबाविरोधात सोशल मीडियावर प्रखरपणे आवाज उठवत लिखाण केले होते.
ऋषिकेश वैद्यचा भाऊही खोटारडाच…
याच दरम्यान, आरोपीचे मोठे बंधू वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य हे पुरीच्या शंकराचार्यांचे शिष्य असल्याचा दावा करत असले तरी, भूपेश पाटील यांनी त्यावेळी संबंधित पीठाकडून माहिती घेतली असता असा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले आहे.तसेच, सध्याच्या प्रकरणातील पीडित तरुणीही त्यावेळी भूपेश पाटील यांच्या संपर्कात आली होती. त्यांनी तिला पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.या दोन्ही बंधूंविषयी आणखी एक बाब समोर आली असून, घरगुती पूजा-अर्चा करण्याच्या नावाखाली 25 ते 40 हजार रुपये घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती’ असं सांगत महिलेला लॉजवर नेऊन ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित बाबाने महिलेला अमली पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने केलेल्या आरोपानुसार आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉज मध्ये घेऊन गेला होता. मादक पदार्थ देऊन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला. त्यानंतर भोंदू बाबाने महिलेचे फोटो काढले होते. यासंबंधीत प्रकरणाची सुरुवात वसईत झाली होती. पुढील तपासासाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्यला अटक केली. ऋषिकेश वैद्य विषयी अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत.
दरम्यान, भूपेश पाटील यांनी आवाहन करत सांगितले की, “या भोंदू बाबा विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवावा. कोणावरही अत्याचार झाला असेल तर निर्भीडपणे पुढे यावे. पोलिस आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.” तसेच, ‘आमची वसई’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आरोपी तरुण-तरुणींशी संपर्कात होता, त्यामुळे आणखी काही जण या प्रकाराला बळी पडले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपास अधिक व्यापक करण्यात येण्याची शक्यता असून, जुन्या प्रकरणांची ही चौकशी होऊ शकते.
आणखी वाचा
Comments are closed.