भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय

अशोक खरात ईडी चौकशी: भोंदूबाबा अशोक खरात यांच्याभोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. सध्या अशोक खरात (Ashok Kharat) याची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी सुरु आहे. मात्र, आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अनेक राजकारण्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची (ED) एन्ट्री होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून (Enforcement directorate) चौकशी होण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे आतापर्यंतच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आले आहे. अशोक खरात हा आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे. खरात हा त्याच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक आणि राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन तो व्याजाने द्यायचा, अशी शक्यता आहे. याशिवाय, तो हवालामार्फत देश-विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करत आल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्याची चौकशी ई़डीकडून होण्याची शक्यता आहे. अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे. यानंतर ईडी या तपासाची सूत्रे हाती घेऊ शकते. तसे घडल्यास अशोक खरात याच्या अडचणी वाढू शकतात.

दरम्यान, अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला रविवारी पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत अशोक खरात याच्यावर 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 10 पैकी 8 गुन्हे महिलांवर केलेल्या अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीसंदर्भात आहेत. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी खरातला अजून काही दिवस पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाणार  असल्याची माहिती आहे. आतापर्यंत काय तपास केला, काय धक्कादायक माहिती समोर आली याचा तपशील सरकारी पक्षाकडून कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत अशोक खरातची पोलीस कोठडी वाढणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती

आणखी वाचा

Comments are closed.