खरातचा पेनड्राइव्ह उघडला तर सरकार….; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; बड्या नेत्यांच्या ‘अंध

नागपूर: भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असतानाच, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)  यांनी यावरून सरकारला थेट इशारा दिला आहे. “दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणतात ३९ आमदार खरातला भेटायला जायचे, मग त्यांनी ही यादी जाहीर का केली नाही? जर खरातचा पेनड्राइव्ह उघडला, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल आणि हे सरकार अडचणीत येईल,” असा खळबळजनक दावा वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे.

बड्या नेत्यांची ‘अंधारातील पापं’ झाकण्यासाठी खरातकडे वारी?

वडेट्टीवार यांनी खरातला भेटणाऱ्या बड्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “अमावस्येच्या रात्री अनेक बडे नेते खरातच्या घरी जात होते. अंधारात आपली पापं झाकण्यासाठी हे नेते तिथे हजेरी लावत होते. खरातला साथ देणारे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे अनेक उच्चपदस्थ लोक आहेत. या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. केवळ एसआयटी (SIT) कडून काही निष्पन्न होणार नाही, या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखालीच व्हायला हवी.” जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार खरात आणि त्याला सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.(Vijay Vadettiwar)

खरातच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले, “मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खरातचे काही बरे-वाईट केले जाऊ शकते. जसा बदलापूर प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रकार इथेही घडू शकतो. पुरावे नष्ट करण्यासाठी खरातला संपवले जाण्याची भीती आहे, सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे.”

गॅस सिलेंडरच्या रांगेत नागरिक मरतायत

देशातील एलपीजी गॅस टंचाईवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडले आहे. केवळ निवडणुका जिंकणे आणि सत्ता मिळवणे हेच भाजपचे काम आहे. गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे राहून नागरिकांचे मृत्यू होत आहेत, याला मोदी सरकारच जबाबदार आहे. इराणसारखा मित्र देश आज आपल्या परराष्ट्र धोरणामुळे शत्रू झाला आहे. हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान करून विकास होणार नाही,” असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे विलीनीकरण म्हणजे ‘अजगराच्या पोटात जाणे’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चेवर वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली. “भारतीय जनता पक्ष हा दक्षिण आफ्रिकेतील ॲनाकोंडाचा बाप आहे. जो त्यांच्या पोटात जातो, तो पुन्हा दिसत नाही. भाजप एकेकाला गिळंकृत करण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीची ही वाटचाल फार काळ टिकणार नाही, ते लवकरच गिळंकृत केले जातील,” असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल

काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी १५ तारखेपर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारूनच नवीन नेतृत्व अंतिम केले जाईल, ज्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला मोठी मजबूती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा

Comments are closed.