फडणवीसांचा केरळमधून एक फोन, शिवाजीराव कर्डिलेंच्या लेकासमोरील सर्वात मोठा धोका दूर, प्राजक्त त

राहुरी पोटनिवडणूक 2026 प्राजक्त तनपुरे: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राजकारणाचा दीर्घ अनुभव असून त्यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. त्यामुळे भाजपचे पाठबळ असूनही अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना राहुरीची पोटनिवडणूक (Rahuri bypoll 2026) जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला. सोमवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन अनुभवी नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. यानंतर या तिघांमध्ये बराच काळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर प्राजक्त तनपुरे यांचा राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार 180 अंशांच्या कोनात बदलल्याचे दिसले. (Maharashtra Politics)

रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले असले तरी या सगळ्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, आज सकाळी रवींद्र चव्हाण हे तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. या एका फोन कॉलने प्राजक्त तनपुरे यांचे मन वळाल्याचे सांगितले जाते. आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल, असे आश्वासन फडणवीसांनी तनपुरे यांना दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण चालवणाऱ्या मोठ्या नेत्याने शब्द दिल्याने प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीत जिंकण्याची चांगली शक्यता असतानाही माघार घ्यायला तयार झाल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

दुपारी तीन वाजण्यापूर्वी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, याची कल्पना असल्याने शरद पवार गटाच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास गोविंद मोकाटे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. तेव्हाच प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.

Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे काय म्हणाले?

प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हाच त्यांचा सूर बदलल्याचे दिसून आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील इतक्या मोठ्या लोकांनी मला विनंती केली आहे. त्यामुळे मी आता विचार करत आहे. राहुरीतील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, असे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

राहुरीत भाजपने शेवटच्या क्षणी डाव टाकलाच, विखे-पाटील, चव्हाणांची तनपुरेंशी चर्चा, थेट फडणवीसांनाच फोन लावून दिला अन्…

आणखी वाचा

Comments are closed.