नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप
मुंबई : निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाड (Vilas Lad) याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड हा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसत आहे. कुंभमेळ्यासाठीच्या 1 हजार 21 प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत, आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचं कमिशन मिळणार आहे, असा दावा विलास लाडने केला आहे. एबीपी माझा या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्ठी करत नाही.
एसीबीच्या अटकेत असलेल्या विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो समोरच्या व्यक्तीला नाशिकच्या कुंभमेळ्यातील टेंडर आणि त्यातील कमिशनबाबत माहिती देताना दिसतोय आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचं कमिशन मिळणार असल्याचा दावा करताना दिसतोय. अटकेत असलेला आरोपी विलास लाड याने या फोन संभाषणात केलेले दावे खरे की खोटे याची कोणतीही स्पष्टता नाही.
कोट्यवधींच्या कमिशनचा दावा
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी काही हजार कोटींचा निधी आला आहे. त्यामध्ये आपला कोटा 500 कोटींचा असल्याचा दावा विलास लाडने केला आहे. यामध्ये आपण स्वतः 700 तंबूंचं टेंडर घेतलं आहे, तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडरही घेतल्याचा दावा विलास लाडने केला आहे.
या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटींचं असून ते आपल्याला मिळाल्याचा दावा विलास लाडने केल्याचं दिसतंय. 40 दिवसांचा कुंभमेळा असून त्यामध्ये एवढा खर्च येत नाही, यातून मोठं कमिशन मिळणार असल्याचा दावा विलास लाडने केला आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी टेंडर मॅनेज करून झाली आहेत. त्यामध्ये छोट्या अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी फिक्स झाल्याचा दावा विलास लाडने या ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं दिसतंय. ई टॉयलेट पासून साफसफाईची हजारो कामे आहेत, त्यातून लाखो रुपये कमावता येतील असा दावा त्याने केला आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांना ही टेंडर देऊयात असा विश्वास विलास लाडने समोरच्या व्यक्तीला दिला आहे.
विलास लाडला पोलीस कोठडी
राज्य शासनाच्या अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला सत्र न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लाचप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. खारघर परिसरात अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचून विलास लाडला लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे एसीबीने केलेल्या छापेमारीत लाडच्या घरात 2 लाखांची रोकडही सापडली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.