Ratnagiri News – खेडच्या सुपुत्राची हिंदुस्थानी सैन्यात मोठी झेप; मेजर रूपेश जाधव आता ‘लेफ्टनंट कर्नल’
खेड तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावाने हिंदुस्थानी सैन्य दलात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या गावाचे सुपुत्र रुपेश मनोहर जाधव यांची हिंदुस्थानी सैन्य दलातील ‘लेफ्टनंट कर्नल’ (Lt Col) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. जोधपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यामुळे केवळ जाधव कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण खेड तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
या पदोन्नती सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रुपेश जाधव यांचे वडील निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि त्यांच्या मातोश्री मनीशा मनोहर जाधव यांची उपस्थिती. एका निवृत्त सैनिकी पित्यासाठी आपला मुलगा लष्करातील वरिष्ठ अधिकारी बनणे, हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. जोधपूर येथे झालेल्या कार्यक्रमात आई-वडिलांनी स्वतः आपल्या हातांनी रुपेश यांच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नल पदाचे स्टार्स लावले. यावेळी उपस्थितांना एक अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद प्रसंग पाहायला मिळाला.
रुपेश जाधव यांचा लष्करी प्रवास जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. 13 एप्रिल 2013 रोजी ते भारतीय सैन्य दलाच्या ‘आर्मी मेडिकल कोअर’ (AMC) मध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. गेल्या 13 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध दुर्गम आणि आव्हानात्मक भागांत अत्यंत निष्ठेने आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या या समर्पित देशसेवेची दखल घेत हिंदुस्थानी लष्कराने त्यांना या वरिष्ठ पदावर पदोन्नत केले आहे.
एका ग्रामीण भागातून येऊन, खडतर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लष्करातील या उंचीवर पोहोचल्याबद्दल रुपेश जाधव यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रवास रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा ठरणार आहे. सध्या त्यांची नियुक्ती राजस्थानमधील जोधपूर येथे असून, त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.