एकाच इंजेक्शन सीरिंजचा वारंवार वापर, पाकिस्तानात 331 मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानातील आरोग्य सेवेबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 331 बालकांना ‘एचआयव्ही’चा संसर्ग झाला आहे. एकाच इंजेक्शन सीरिंजचा वारंवार वापर करण्यात आला. एक आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर हा भोगळ कारभार समोर आला.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ताउंसा शहरात हा प्रकार घडला आहे. ताउंसाच्या सरकारी रुग्णालयात एकाच औषधाच्या बाटलीतून एकाच सीरिंजमधून औषध देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडला. लक्षात येईपर्यंत 331 बालकांमध्ये एचआयव्हीचा संसर्ग पसरला होता.

आठ वर्षांच्या मोहम्मद अमीन याचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्याची बहीण असमा हिलादेखील एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे. मुलांना रुग्णालयात उपचारादरम्यान विषाणू संसर्ग असलेल्या सीरिंजच्या वापरामुळे एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. या प्रकाराचा कुटुंबीयांवर मोठा परिणाम झाला आहे. असमापासून लोक आता लांब राहतात. त्यामुळे तिला एकटेपणा वाटतो. असमाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे, असे तिची आई सांगते.

खासगी क्लिनिकच्या डॉक्टरनी सर्वप्रथम आणले उघडकीस

एचआयव्हीचा संसर्ग लहान मुलांमध्ये पसरत असल्याचे सर्वप्रथम खासगी क्लिनिक चालवणारे डॉ. गुल पैसरानी यांच्या लक्षात आले. 65 ते 70 बाधित मुलांवर ताउंसाच्या सरकारी रुग्णालयात उपचार झाले होते. एकाच सीरिंजचा वारंवार वापर होत असल्याची तक्रार काही मुलांच्या पालकांनीही केली होती. 97 बाधित बालकांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 4 मुलांच्या माता एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळल्या. त्यामुळे संसर्ग आईपासून मुलांना झालेला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संसर्गाच्या इतर कारणाच्या शक्यतांचाही तपास केला जात आहे.

धोकादायक सुई संसर्गाचे कारण

पंजाब प्रांताच्या एड्स चाचणी मोहिमेच्या अहवालानुसार निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये धोकादायक सुईमुळेच संसर्ग पसरल्याचे म्हटले आहे. 2019 मध्येदेखील अशा प्रकारे एचआयव्हीचा संसर्ग पसरल्याचे उघड झाले होते.

Comments are closed.