‘युद्ध नको, तोडगा हवा, पण…’; इराणच्या राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचा अमेरिकेला कडक इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू होणार आहे. तत्पूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी मोठे विधान केले आहे. इराणला युद्ध नको असून चर्चा आणि सहकार्याने प्रश्न सोडवायचे आहेत. मात्र कोणी आमच्यावर अटी लादण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केले जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे.
इराणने कधीही संघर्षाची बाजू घेतली नाही. परंतु, देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणासमोरही झुकण्यास इराणची जनता तयार नाही, असे पेझेश्कियान यांनी म्हटले. तसेच अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.
आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत निष्पाप नागरिक, मुले, रुग्णालये आणि शाळांना लक्ष्य करण्याचे समर्थन कसे केले जाऊ शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इराणची वृत्तसंस्था आयआरएनएच्या हवाल्याने ‘आजपर्यंत‘ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये 28 फेब्रुवारीला युद्धाची सुरूवात झाली. दीड महिन्यानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी 11 एप्रिल रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशाच्या शिष्टमंडळामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. इराणचे प्रतिनिधित्व संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी केले, तर अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांनी केले. मात्र अनेक फेऱ्यांनंतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत न झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. आता चर्चेची दुसरी फेरी येत्या 48 तासांमध्ये होणार आहे.
Comments are closed.