शेतकऱ्यांना योग्य न्याय दिल्यास देश महासत्ता बनेल – खासदार नीलेश लंके
राज्यातच नव्हे; तर संपूर्ण देशात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱयांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून, याची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱयांच्या शेतीमालासह दुग्ध व्यवसायाला योग्य हमीभाव देऊन शेतीपूरक लागणारे खते, औषधे, बी-बियाणे यांच्या किमती योग्य ठेवल्यास शेतकरी सुधारेल. शेतकरी सुधारला तर देश सुधारेल आणि महासत्ता बनेल, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज यांच्या नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत वीस लाख रुपये खर्चाचे पालखीमार्गाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
खासदार लंके म्हणाले, आज देशातील संपूर्ण शेतकरी अडचणीत सापडला असून, त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे तो कर्जाच्या खाईत बुडून आत्महत्या करत आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. शेतकऱयांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे, याला राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही जबाबदार आहेत. बळीराजाला योग्य न्याय दिल्यास देश महासत्ता बनेल; परंतु राज्यकर्ते सत्तेच्या धुंदीत असून त्यांना गोरगरीब जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
जिह्यातील बरेच अधिकाऱयांना माझ्या भाषेत सांगावे लागते. तेव्हाच जनतेची कामे होतात. आजही पंचायत समितीचे उपअभियंता आणि गटविकास अधिकारी उपस्थित नाहीत. यांना नंतर जाब विचारू. जनतेच्या हिताच्या कामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. मी नेहमीच संसदेत शेतकऱयांचे प्रश्न मांडत असतो. नशिबावर भरोसा ठेवा, चांगले दिवस निश्चित येतील, असा विश्वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस काकडे सर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दळवी, ह.भ.प. बापू महाराज हिरवे, दत्तात्रेय हिरवी, महेंद्र इथापे, राहुल दानवे उपस्थित होते.
Comments are closed.