बोरघाटाच्या नशिबी केमिकल लोच्याचे दुष्टचक्र सुरूच; टँकर उलटल्याने प्रवाशांमध्ये पुन्हा घबराट, 2 महिन्यांतील तिसरी घटना
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटाच्या नशिबी केमिकल लोच्याचे दुष्टचक्र अजूनही सुरूच आहे. दोन महिन्यांपूर्वी अत्यंत ज्वलनशील प्रोप्लेन गॅस वाहून नेणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटून तब्बल ३४ तास रेकॉर्डब्रेक वाहतूककोंडी झाली होती. आज मध्यरात्री एकच्या सुमारास बोरघाटामधील वाळक्याच्या मोरीजवळ एक केमिकल टँकर उलटल्याने प्रवाशांमध्ये पुन्हा घबराट निर्माण झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त टँकर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा ऑइल टँकर बोरघाटातील वाळक्याच्या मोरीजवळ आला असता अचनाक ब्रेक फेल झाले आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स हेल्प फाऊंडेशन, खोपोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने मदतकार्य सुरू केले.
चालक केबिनमध्ये अडकला
टँकर रस्त्यावर उलटताच केबिनमधील चालक बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो आतमध्येच अडकला होता. आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या १० ते १५ मिनिटांत चालकाला बाहेर काढले. त्यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघातातील टँकर सुरक्षितस्थळी नेण्यात आला. अर्ध्या तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
सुटकेचा निःश्वास सोडला
टँकरवर ज्वलनशील रसायन असे लिहिल्याने रसायन तज्ज्ञ धनंजय गीध यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी टँकरची तपासणी केली असता आतमध्ये ज्वलनशील पदार्थ नव्हे तर खाद्य तेल असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान ज्वलनशील रसायनाच्या टँकरमधून खाद्यतेलाची वाहतूक कशी करण्यात आली याची चौकशी पोलीस करीत आहेत.
Comments are closed.