Fork Design: काटा चमच्याला फक्त 4 दाते का असतात? जाणून घ्या रंजक कारण
जेवताना आपल्या हातात सहजपणे येणारा ‘फोर्क’ म्हणजेच काटा आपण रोज वापरतो. नूडल्स असो, पास्ता असो किंवा साधा भात काटा हा काहीही खातानाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, काट्याला नेहमीच 4 दाते का असतात? 2 किंवा 5 दाते का नाहीत? हा प्रश्न साधा वाटला तरी त्यामागे इतिहास, विज्ञान आणि वापरातील सोयीचा खोल संबंध आहे. (why forks have 4 tines science history)
काट्याचा रोचक इतिहास
काट्याचा वापर हा आजचा नाही, तर प्राचीन संस्कृतींपासून सुरू झालेला आहे. इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये काट्यासारखी साधनं स्वयंपाकासाठी वापरली जात होती. मात्र, जेवणासाठी त्याचा वापर फारसा होत नव्हता. मध्ययुगीन युरोपमध्ये हाताने किंवा चाकूने खाणं हीच पद्धत होती. त्या काळात काटा वापरणं हे विचित्र मानलं जायचं. काही ठिकाणी तर काट्याला अनावश्यक लक्झरी समजलं जात होतं.
सुरुवातीचे काटे फक्त 2 दाते
सुरुवातीला वापरले जाणारे काटे हे फक्त 2 दातांचे होते. हे प्रामुख्याने मांस टोचण्यासाठी उपयुक्त होते. मात्र, भात, नूडल्स किंवा पास्तासारख्या पदार्थांसाठी ते योग्य नव्हते. अन्न सहजपणे घसरून पडायचं आणि खाणं अवघड व्हायचं.
पास्ता आणि नूडल्स लोकप्रिय होत गेले तसे काट्याच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली. 3 दात्यांचे काटे वापरात आले, पण त्यातही अन्न नीट धरून ठेवण्याची समस्या कायम राहिली. 18 व्या शतकाच्या शेवटी इटलीमध्ये 4 दातांचा काटा लोकप्रिय झाला. या डिझाइनमुळे अन्न अधिक स्थिरपणे पकडता येऊ लागलं आणि खाणं अधिक सोपं होऊ लागलं.
चार दातेच का सर्वात योग्य?
4 दातांचा काटा हा सर्वात संतुलित डिझाइन मानला जातो. यामागे काही ठोस कारणं आहेत. चार दाते अन्नाला योग्य आधार देतात, त्यामुळे पास्ता, नूडल्स किंवा भात सहज उचलता येतो. दोन किंवा तीन दाते असतील, तर अन्न नीट पकडता येत नाही. दुसरीकडे, 5 किंवा 6 दाते असलेले काटे बनवण्याचे प्रयोग झाले, पण ते खूप रुंद आणि जड ठरले आणि त्याचा वापर करणं ही अवघड जाऊ लागलं.
काट्याला चार दाते असण्याचे फायदे
चार दातांचा काटा मात्र मांस टोचण्यासाठी, भाजी उचलण्यासाठी आणि अगदी छोटे अन्नकण उचलण्यासाठीही योग्य ठरतो. म्हणजेच एकाच साधनात अनेक उपयोग शक्य होतात. काट्याचे दाते थोडे वक्र (curved) असतात. यामुळे अन्न सहज पकडता येतं आणि खाली पडत नाही. हा आकार मानवी हाताच्या हालचाली आणि गुरुत्वाकर्षण लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. तसेच 4 दातांचा काटा बनवताना कमी धातू लागतो, त्यामुळे तो हलका आणि वापरण्यास सोयीचा राहतो. यामुळे उत्पादन खर्चही कमी राहतो आणि वापरातही आरामदायी वाटतो.
Comments are closed.