शेअर बाजारात पैशांचा पाऊस, एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होण्याची चिन्ह निर्माण झाल्यानं आणि क्रूड ऑईलच्या दरात घसरण होऊन ते 95 डॉलर प्रति बरॅलवर आले. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात आयटी, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑईल अँड गॅस आणि केमिकल्स सेक्टर्सला आधार मिळाल्यानं त्यात तेजी पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारात लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्समध्ये खरेदी पाहायला मिळाली. निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली.
सेन्सेक्सवर आज 1263.67 अंकांची तेजी दिसून आली. दुपारी साडे तीन वाजता बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 78114.24 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 388.65 अंकांनी वधारुन 24231.30 अंकांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांची 9 लाख कोटींची कमाई
भारतीय शेअर बाजारात बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं 13 एप्रिलला बाजारमूल्य 449 लाख कोटींवर होतं. आज 15 एप्रिलला बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजामूल्य 458 लाख कोटींवर पोहोचलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी एका दिवसात 911628. 78 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांपैकी 28 शेअर तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजी इंडिगो, इटरनल आणि पॉवरग्रीडमध्ये दिसून आली. तर, घसरण एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये दिसून आली.
शेअर बाजारात सर्वाधिक तेजी कोणत्या स्टॉक्समध्ये ?
निफ्टीवरील 500 स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये दिसून आली. रेलटेलचा स्टॉक्स 18 टक्क्यांनी वधारुन 336 रुपयांवर पोहोचला.जुलै 2024 नंतर रेलटेलच्या स्टॉकमध्ये एका दिवसात सर्वाधिक तेजी दिसून आली.
गॅलँट इस्पातच्या शेअरमध्ये आज 16.4 टक्के तेजी दिसून आली. यानंतर सर्वाधिक तेजी रिलायन्स पॉवर, पीजी इलेक्ट्रॉप्लास्ट, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयप्रकाश पॉवर वेंचर्सच्या शेअरमध्ये दिसून आली. या शेअरमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली आहे. निफ्टी आयटी स्टॉक्समध्ये देखील तेजी दिसून आली आहे. ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस, कोफोर्ज, एम्फॅसिस, टेक महिंद्रा आणि विप्रोच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
दरम्यान, शेअर बाजारातील तेजी यापुढे कायम राहते का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.