अत्यावश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून वगळा, कामगार सेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
महापालिकेतील रिक्त शेड्युल पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यात प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांकरिता जुंपण्यात आले आहे. ही बाब लक्षात येताच आज म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर धडक देत आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. किमान अत्यावश्यक खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्त्यव्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी यावेळी कामगार सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई महापालिकेत तब्बल 57 हजार 907 रिक्त शेड्युल्ड पदे असून अद्याप त्याची भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यातच प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यार्थ पाठवल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. ही बाब महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी त्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाच्या 2023च्या आदेशाचा संदर्भ देत त्यांनी अत्यावश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी अशी मागणी केली. पालिका रुग्णालयातील निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाकरिता पाठवले तर रुग्णालयीन सेवेवर त्याचा परिणाम होईल तसेच लिपिक संवंर्गावाचून कर्मचाऱ्यांच्या आस्थापना कामांचा खोळंबा होईल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस, चिटणीस हेमंत कदम, रंजना नेवाळकर, अजय राऊत, मंगल तावडे, संजय वाघ, संदीप तांबे आदी शिष्टमंडळात होते.
Comments are closed.