आरसीबीविरोधात सीएसकेची बीसीसीआयकडे तक्रार, 'डोसा इडली' गाण्याचे नेमके प्रकरण घ्या जाणून

आयपीएल २०२६ मध्ये ५ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) भिडले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यावेळी ‘डोसा इडली सांबार चटणी-चटणी’ गाणे वाजवले गेले होते, त्यावरूनच सीएसकेने आरसीबी विरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) औपचारिक तक्रार दाखल केली आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सीएसकेच्या मते त्यांचा डाव सुरू होता तेव्हा आरसीबीच्या डीजेने गाणे वाजवले होते. या गाण्यात ‘डोसा, इडली, सांबार,चटणी’, असे उल्लेख होते. जे फ्रॅंचायजीला एका साचेबद्ध विचारांचे आणि त्यांच्या तामिळनाडूच्या अस्मितेची खिल्ली उडवणारे वाटले. सध्या आरसीबीने सीएसकेविरुद्ध सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच या दोन्ही फ्रॅंचायजीच्या चाहत्यामध्ये तीव्र स्पर्धा आहे, त्यातच हे गाणे वाजल्याने तणाव आणखीनच वाढला.

या घटनेबाबत आयपीएलच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने सांगितले की नियामक परिषद या प्रकरणाची चौकशी करेल. “आम्हाला सीएसकेकडून तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत”, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “सहसा यजमान संघाला पाठिंबा देण्यासाठी डीजे असतात, मात्र चिन्नास्वामी स्टेडियममधील परिस्थिती वेगळी होती. आमच्या खेळाडूंविरोधात काही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. यामुळेच आम्ही बीसीसीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.”

एप्रिल ५ च्या सामन्यात जेव्हा त्यांचे खेळाडू बाद होत होते तेव्हा डीजेने वाजवलेल्या गाण्यावरही सीएसकेने आक्षेप घेतला आहे. त्याबाबत विश्वनाथन म्हणाले, “मोठे फटके आणि विकेट्स पडल्यावर जल्लोष करून सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे डीजेचे काम आहे. ते प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी नसतात.”

गेल्या काही हंगामांपासून सीएसके आणि आरसीबी यांच्यात तीव्र स्पर्धा आहे, ज्यामुळे या दोन्ही संघाच्या सामन्याला ‘द सदर्न डर्बी’ असे म्हटले जाते. दोन्ही संघांचे समोरा-समोरच्या सामन्यांचे निकाल पाहिले तर सीएसके आघाडीवर आहे, मात्र मागील काही सामन्यांमध्ये आरसीबी वरचढ ठरली आहे. नुकतेच झालेल्या सामन्यातही आरसीबीने सीएसकेचा ४३ धावांनी पराभव केला.

मागील वर्षीही जेव्हा आरसीबीचा विकेटकीपर जितेश शर्माचा डोसा, इडली, सांबार,चटणी हे गाणे गातानाचा एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यावर सीएसकेच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मागील हंगामापासून आरसीबीने जो वेग पकडला आहे, तो या हंगामातही कायम आहे. सीएसकेविरुद्धच्या प्रथम फलंदाजी करताना टीम डेविडच्या २५ चेंडूतील नाबाद ७० धावांमुळे आरसीबीने २० षटकात ३ विकेट्स गमावत २५० धावसंख्या उभारली होती. यामध्ये संघाचा कर्णधार रजत पाटीदारने १९ चेंडूत नाबाद ४८ धावा ठोकल्या. तसेच देवदत्त पड्डीकलने ५० आणि फिल सॉल्टने ४६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात सीएसकेची सुरूवात खराब झाली. त्यांनी पॉवरप्लेमध्येच महत्वाच्या विकेट्स गमावल्या. सरफराज खानने ५० धावा आणि प्रशांत वीरने ४३ धावा करत संघाचा धावफलक काहीसा हलता ठेवला. तसेच जेमी ओव्हरटनने ३७ धावा केल्या, मात्र सीएसकेने १९.४ षटकातच सर्व विकेट्स गमावल्या आणि केवळ २०७ धावा केल्या होत्या. यामध्ये आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

Comments are closed.