PSL 2026: हो-नाहीच्या गोंधळात फ्री हिटवर रनआऊटचा गमावला चान्स, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये बुधवारी (१५ एप्रिल) पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना खेळला गेला. यामध्ये पेशावरने क्वेटाला ८ विकेट्सने पराभूत केले. यामधील फ्री हिटवर झालेला गोंधळ सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हे गल्ली क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
यामध्ये क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला धावबाद करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र त्याने मुर्खपणा करत ती गमावली. त्यामुळे पुन्हा एकदा पीएसएलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झाले असे की, अली रझा याने कंबरेच्या उंचीचा नो-बॉल टाकल्यानंतर अबरार अहमद फ्री हिटसाठी स्ट्राईकवर होता. त्याने चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ढकलला आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उस्मान तारिक बराच पुढे आला होता, मात्र अबरारने त्याला परत पाठवले. क्षेत्ररक्षकाने तो चेंडू पकडला आणि गोलंदाजाकडे फेकला. तो थ्रो चुकला, जर चेंडू स्टम्प्सला लागला असता तर तारिक बाद झाला असता.
या गोंधळाच्या स्थितीनंतरही पेशावरने त्यांचे सामन्यावर नियंत्रण ठेवले. सुफियान मुकीम आणि इफ्तिखार अहमद यांनी गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत क्वेटाला १५४ धावांवर रोखले.
या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर क्रिकेटप्रेमींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. काही जण ‘एक्स’वर ‘जोकर’ असे लिहित असून काही ‘दर्जेदार क्षेत्ररक्षण’ म्हणून चिडवत आहेत. तसेच काहींनी त्या क्षेत्ररक्षकाला ‘स्वस्त जॉन्टी ऱ्होड्स’ म्हटले आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझमने ५१ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. त्याने मोहम्मद हॅरिससोबत ७५ धावांची आणि कुशल मेंडिससोबत ४९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे पेशावरने १८.३ षटकातच ८ विकेट्स शिल्लक राखत लक्ष्य पार केले. या विजयामुळे ते प्लेऑफ पात्रतेच्या अधिक जवळ आले आहेत आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहेत.
या लीगमधील लाहोरमध्ये तीन वेळच्या विजेत्या इस्लामाबाद युनायटेडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर या विजयामुळे पेशावरने सात पैकी सहा सामने जिंकले आणि त्यांचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे.
Comments are closed.