बंगळुरूचा विजयी सलाम, लखनौला सहज नमवत गुणतालिकेत आरसीबी टॉपवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) पुन्हा एकदा चिन्नास्वामीवर आपली दहशत दाखवताना लखनौचा सहज धुव्वा उडवत विजयाची हॅटट्रिक साजरी केली आणि पाच सामन्यांत चौथ्या विजयाची नोंद करत गुणतालिकेत राजस्थानला मागे टाकत प्रथमच अव्वल स्थान काबीज केले. बंगळुरूच्या सहजसुंदर विजयात रसिख सलामच्या 4 विकेटनी लखनौला लोळवण्याची किमया साधून  दिली.

कोहलीची विजयी फटकेबाजी

लखनौचे 147 धावांचे आव्हान आरसीबी सहजच पार पाडणार, हे निश्चित होते. विराट कोहलीने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत आरसीबीला विजयाच्या ट्रॅकवर नेले. मात्र फिल  सॉल्ट खेळपट्टीवर थांबला नाही. तेव्हा कोहलीने देवदत्त पडिक्कलसह 57 धावांची भागी रचली. कोहलीची खेळी अर्धशतकाला स्पर्श करू शकली नाही. तो 49 धावांवर बाद झाला. त्याने वैभव सूर्यवंशीला मागे टाकत 228 धावांसह  ऑरेंज कॅप स्वतŠकडे खेचली. त्यानंतर रजत पाटीदार आणि जितेश शर्माने संघाला विजयासमीप नेले, मात्र प्रिन्स यादवने एकाच षटकात या दोघांची विकेट काढत सामन्यात रंगत आणली. मात्र त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्डने 29 चेंडू राखून आरसीबीच्या चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब करत संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवले.

रसिखने कंबरडे मोडले

आपल्या चिन्नास्वामीवर तिसरा सामना खेळत असलेल्या आरसीबीला पहिल्या डावातच सामन्यावर पकड मिळवून देण्याची करामत भुवनेश्वर कुमार आणि रसिख सलामने दाखवली. रसिखनेच एडन मारक्रमला बाद करत आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मिचेल मार्शने लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुणाचीही साथ लाभ नाही. भुवनेश्वर आणि जॉश हेझलवूडने लखनौच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले तर रसिख सलामने आपल्या माऱ्यापुढे लखनौच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. त्याने 24 धावांत 4 विकेट घेत लखनौचा डाव 146 धावांवर संपवला. आयुष बदोनी (38) आणि मुकुल चौधरीने (39) लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांचाही अडसर रसिखने दूर करत बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. भुवनेश्वरनेही 3 विकेट टिपत आपलीही कामगिरी चोख बजावली.

Comments are closed.