यजमान आणि गतविजेते पहिल्याच फेरीत बाद; सीसीआय, डी. वाय. पाटील, इस्लाम जिमखान्याची दमदार सुरुवात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेच्या विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई यांच्या गौरवार्थ आयोजित एसपीजी टी-20 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्क्यांची मालिका अनुभवायला मिळाली. यजमान शिवाजी पार्क जिमखाना आणि गतविजेता पार्कोफिन क्रिकेटर्स या संघांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले तर सीसीआय, डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अॅकॅडमी, कर्नाटक स्पोर्ट्स क्लब आणि इस्लाम जिमखाना यांनी दमदार विजय नोंदवत विजयी सलामी दिली.

या स्पर्धेच्या उद्घाटनीय लढतीत एसपीजीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 189 धावा उभ्या केल्या. एसपीजीच्या डावात आशय दुबे (53), रझा मिर्झा (42) आणि दशरथ चव्हाण (30) यांनी उपयुक्त खेळ्या केल्या, पण 190 धावांचे आव्हान कर्नाटक स्पोर्ट्स क्लबने सहजगत्या पार पाडले. अनिश चौधरी (71) आणि गौरीश जाधव (नाबाद 46) यांच्या धडाकेबाज खेळीमुळे कर्नाटकने केवळ 18.3 षटकांत 4 बाद 193 धावा करत एसपीजीला बाहेरचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या सामन्यात जय बिस्ताने स्पर्धेतील पहिले शतक झळकावत नाबाद 115 धावांची तुफानी खेळी केली. शाश्वत जगताप (61) सोबत त्याने व्हिक्टरी  क्रिकेट क्लबला 227/2 अशी जबरदस्त मजल मारून दिली. पण डी. वाय. पाटील स्पोर्ट्स
अॅपॅडमीसमोर हे आव्हानही सामान्य भासले. त्यांच्या अभिज्ञान पुंडू (72), प्रणव केला (66) आणि हर्ष जाधव (38) यांच्या जोरावर डी. वाय. पाटीलने 4 विकेट गमावून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, आणखी एका लढतीत इस्लाम जिमखानाने पाकाxफिन क्रिकेटर्सचा 192 धावांचा डाव निष्प्रभ ठरवत 193/6 अशी मजल मारली. प्रणय कपाडिया (49) आणि अमोघ भटकळ (46) यांनी संघाला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. त्यामुळे गतविजेत्यांचा गड पहिल्याच टप्प्यात कोसळला.

'रत्नांचे अन्न' पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी पार्क जिमखान्याच्या खेळपट्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. आपल्या थोडक्यात भाषणात त्यांनी खेळाडूंना वेळेचे भान ठेवत दर्जेदार क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. यावेळी ‘खाण रत्नांची’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक मिलिंद घैसास, जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, सरचिटणीस संजीव खानोलकर, संयुक्त सचिव सुनील रामचंद्रन, कार्याध्यक्ष दीपक मुरकर, प्रसिद्ध वास्तुविशारद सुनील सडेकर आणि माजी आमदार नितीन सरदेसाई उपस्थित होते.

Comments are closed.