तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर आयकराचे छापे
विधानसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांची बेधडक कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे टीएमसी आमदार देबाशीष कुमार यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मनोहरपुकुर रोडवरील त्यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात झाली. देबाशीष कुमार हे दक्षिण कोलकातामधील राशबेहारी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. आता प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी सुरू झाली असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमधील एका सभेत बोलताना ‘आमच्या पक्षाच्या कार्यालयांवर आणि आमच्या उमेदवारांच्या घरांवरही छापे टाकले जात आहेत. पण कितीही कट रचले गेले तरी भाजपचा पराभवच होणारच’ असे जाहीर वक्तव्य केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार देबाशीष कुमार यांच्याशी संबंधित दोन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मनोहरपुकुर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी आणि निवडणूक कार्यालयावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. याचदरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेनेदेखील तृणमूल नेते कुमार साहा यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा टाकला. एका कथित जमीन घोटाळ्याच्या तपासाच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, साहा हे देबाशीष कुमार यांच्या जवळचे मानले जातात.
ममता बॅनर्जी यांचा प्रस्तावकही निशाण्यावर
आमदार देबाशीष कुमार यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर प्राप्तिकर विभागाने भवानीपूर येथील ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारी प्रस्तावकाच्या घरावर छापा टाकला आहे. शुक्रवारी दुपारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 एल्गिन रोड येथील मिराज शाह यांच्या निवासस्थानी धडक दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भवानीपूरमधून उमेदवार म्हणून दाखल केलेल्या तृणमूल सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रस्तावकांपैकी मिराज शाह यांचा समावेश आहे. ते एक चार्टर्ड अकाउंटंट असून एका शैक्षणिक संस्थेचे प्रमुख आहेत. त्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्याबद्दल तृणमूल काँग्रेसने आवाज उठवला आहे.
Comments are closed.