दुहेरी नागरिकत्व : राहुल गांधी अडचणीत

अन्वेषण करून एफआयआर सादरीकरणाचा आदेश

वृत्तसंस्था / प्रयागराज

राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा प्रकाशात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून त्यांच्या विरोधात एफआयआर सादर करा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला असून त्यामुळे गांधी यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे, असा आरोप असून त्यासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका सादर केली गेली होती.

एस. विघ्नेश शिशीर यांनी ही याचिका सादर केली आहे. आपल्याजवळ राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा पुरावा असून आपण तो अन्वेषण संस्थेला देणार आहोत, असे प्रतिपादन याचिकाकर्त्याने न्यायालयात केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका आणि तिच्यासह जोडलेली कागदपत्रे पाहून या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला. शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली असून सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली. या आदेशाविरोधात गांधी सर्वोच्च न्यायालयात जाणे शक्य आहे.

प्रकरण काय आहे…

राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे, अशी चर्चा बऱ्याच वर्षांपासून होत आहे. एका ब्रिटीश कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक आहेत, असा उल्लेख आल्याने हे प्रकरण उजेडात आले. राहुल गांधी हे जन्माने भारताचे नागरिक आहेत. पण त्यांनी ब्रिटनचेही नागरिकत्व मिळविले असल्याचा आरोप केला जात आहे. काहीवेळा हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. तथापि, आतापर्यंत या प्रकरणात ठोस चौकशी झालेली नाही. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारला सखोल अन्वेषण करावे लागणार असून राहुल गांधी यांनाही न्यायालयात आपली बाजू स्पष्ट करावी लागेल. नियमानुसार, एका व्यक्तीकडे एकाच देशाचे नागरिकत्व असू शकते. दोन किंवा अधिक देशांचे नागरिकत्व असल्यास तो गुन्हा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरचा आरोप खरा आहे किंवा नाही, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर सादर झाल्यानंतर स्पष्ट होईल.

Comments are closed.