गुजरातच्या विजयातही शुबमन गिल नाराज का? नव्या दाढीच्या लूकवरही दिलं मजेशीर उत्तर

शुबमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने शुक्रवारी (17 एप्रिल) आयपीएल 2026 च्या 25व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातची ही यंदाच्या हंगामातील सलग तिसरी जीत ठरली.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 181 धावांचे आव्हान दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरात गुजरातने 19.4 षटकांत 5 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. कर्णधार शुबमन गिलने 86 धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. मात्र शेवटपर्यंत न टिकता बाद झाल्यामुळे तो स्वतःच्या खेळीवर नाराज दिसला.

सामन्यानंतर बोलताना गिल म्हणाला की, वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. “प्रामाणिकपणे सांगायचं तर, 2023 सारखी फलंदाजी होतेय की नाही याने काही फरक पडत नाही. जिंकणं महत्त्वाचं आहे. अंतिम सामना खेळून विजेतेपद जिंकणं हेच माझं लक्ष्य आहे,” असं तो म्हणाला.

आयपीएल 2023 मध्ये 890 धावा करणाऱ्या गिलने यंदाही दमदार सुरुवात केली आहे. चार सामन्यांत 251 धावा करत तो सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. स्वतःच्या बाद होण्याबाबत गिल म्हणाला, “आम्ही हा सामना काही षटकं आधीच संपवू शकलो असतो. ज्या पद्धतीने मी बाद झालो, त्यामुळे मी निराश आहे. मला शेवटपर्यंत राहून सामना संपवायचा होता.”

गोलंदाजांच्या वापराबाबत बोलताना त्याने मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. “ते दोघे ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होते, ते पाहता प्रत्येक चेंडूवर विकेट मिळेल असं वाटत होतं. त्यामुळे त्यांना अतिरिक्त षटक देण्याचा निर्णय घेतला,” असं गिलने सांगितलं.

मधल्या षटकांत कॅमेरून ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवण्याचा प्रयत्न केला, यावर गिल म्हणाला की त्या टप्प्यावर विकेट्स घेणं आणि आक्रमक पर्याय ठेवणं हीच संघाची रणनीती होती.

आपल्या फलंदाजीबाबत बोलताना गिलने फिटनेस आणि मानसिक तयारीवर भर दिला. “फिटनेसवर मी खूप काम केलं आहे. त्यासोबतच खेळाच्या मानसिक आणि तांत्रिक बाबींवरही लक्ष केंद्रित केलं,” असं तो म्हणाला.

मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ‘सध्याच्या क्षणात राहणं’ महत्त्वाचं असल्याचं तो सांगतो. “भूतकाळातील चुका शिकण्यासाठी असतात, पण त्यात अडकून राहायचं नसतं. मैदानावर प्रत्येक वेळी सजग राहणं गरजेचं आहे,” असं त्याने स्पष्ट केलं.

दरम्यान, आपल्या नव्या दाढीच्या लूकबाबत गिलने हसत उत्तर दिलं. “आत्तापर्यंत सगळं ठीक चाललंय. तीन सामने, तीन विजय. पाहू पुढे काय होतं,” असं म्हणत त्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली.

Comments are closed.