IPL 2026 – विजयाचा पंच मारण्यासाठी आरसीबी सज्ज, अव्वल स्थानाच्या निर्धाराने आज दिल्लीशी भिडणार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयाचा ठोसा मारण्यासाठी सज्ज झालाय. चिन्नास्वामीवर विजयाची हॅटट्रिक साजरी केल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चौकार ठोकत पाचव्या विजयासह गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याच्या निर्धारानेच ते दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीसमोर दिल्लीचे आव्हान असले तरी या सामन्यातील खरा रंग मधल्या षटकांमध्येच पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांप्रमाणेच यंदा मधल्या षटकांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे रजत पाटीदार. ‘धुरंधर’ शैलीमुळे रणवीर सिंगची आठवण करून देणारा पाटीदार मैदानावर मात्र धडाकेबाज फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना हादरवतोय. 6 ते 16 षटकांमध्ये आयपीएलमधील सरासरी स्ट्राइक रेट 151.39 असताना पाटीदारचा मात्र तब्बल 223.86 आहे. मधल्या षटकांमध्ये त्याने एकट्याने 18 षटकार ठोकले असून त्याच्या सहकाऱयांच्या एपूण 17 षटकारांपेक्षा ही संख्या जास्त आहे.
हिंदुस्थानचा प्रमुख फिरकीपटू अक्षर पटेल आणि पुलदीप यादव यांच्याविरुद्धही त्याने निर्भीड फटकेबाजी करत आपली छाप पाडली आहे. त्यामुळे आरसीबीच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून तो पुढे आला आहे.
दुसरीकडे, दिल्लीकडून के. एल. राहुल हा प्रमुख फलंदाज आहे. गेल्या हंगामात आरसीबीविरुद्ध 93 धावांची नाबाद खेळी करत त्याने सामना जिंकला होता, मात्र अलीकडे लेगस्पिनविरुद्ध त्याची कामगिरी काहीशी ढासळलेली दिसते. आयपीएल 2025 पासून तो नऊ डावांत दोनदा बाद झाला असून त्याचा फटका दर फक्त 101 आहे. याचा फायदा घेत आरसीबीकडून सुयश शर्मा याला लवकर गोलंदाजी दिली जाऊ शकते.
आरसीबीचा वरचा फलंदाजी क्रम सध्या उत्पृष्ट फॉर्ममध्ये असल्याने जितेश शर्मा याला फारशी संधी मिळालेली नाही. मात्र तो संघासाठी महत्त्वाचा दुवा ठरत असून त्याच्यामुळे टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांना शेवटच्या षटकांत आक्रमक खेळ करण्याची संधी मिळते.
संघरचनेच्या बाबतीत आरसीबी स्थिर दिसत आहे. त्यांनी मागील सामन्यात लखनौवर सहज विजय मिळवत आत्मविश्वास वाढवला आहे. दिल्लीसमोर मात्र अजूनही तिसऱया क्रमांकावर नितीश राणा की आशुतोष शर्मा, तसेच गोलंदाजीत औकिब नबी की विप्रज निगम याबाबत संभ्रम कायम आहे.
Comments are closed.